Daily UpdateNEWSPune | NEWS

पुण्यात धंगेकरांसाठी ठाकरेंची सभा,काँग्रेसमध्ये वाद?

Share Post

मविआचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची कोथरूडमध्ये सभा घेण्यावरून कॉंग्रेसमध्येच वाद झाल्याचे पहायला मिळत आहे. ठाकरे यांची कोथरूडमध्ये जाहीर सभा झाली तर आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाकडून जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरेंची सभा कोथरूडमध्ये होऊ नये, असा काही कॉंग्रेसच्या नेत्यांची मागणी असल्याचं समोर आलं आहे.पुण्यात धंगेकरांसाठी ठाकरेंची सभा काँग्रेसमध्ये वाद?

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्ताने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या सभा, रोड, शो, मेळाव्यांचे नियोजन सुरू आहे. यानिमित्त पुणे कॉंग्रेस भवनात गुरूवारी रात्री कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कॉंग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची किंवा आदित्य ठाकरे यांची सभा घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीवरून कॉंग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. सभा झाली तर कोथरूड विधानसभेवर देखील ठाकरे गटाकडून दावा करण्यात येईल. त्याचबरोबर महापालिका निवडणुकीतील जागावाटपावर याचा परिणाम होईल असे सांगत काही पदाधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळली. 

दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या रविवारच्या सभेवरूनही दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. चव्हाण यांची सभा संगमवाडी, बोपोडी की मुळा रोड येथे घ्यायची यावरून हा वाद झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसापासून कॉंग्रसमधील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याचा मोठा फटका रवींद्र धंगेकर यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

दरम्यान, दुसऱ्या बाजूला सांगलीच्या जागेवरून कॉंग्रेस आणि ठाकरे गटामध्ये ओढातान पाहायला मिळाली. सांगलीची जागा ठाकरे गटाने खेचल्याने तेथील कॉंग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झालेत. त्यात विश्वजीत कदमांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त करत ठाकरे गटाला इशाराच दिला. अशातच पुणे लोकसभेची जबाबदारी विश्वजीत कदम यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासूनच्या घडामोडी पाहता पुणे कॉंग्रेसमध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

पुण्यात धंगेकरांसाठी ठाकरेंची सभा काँग्रेसमध्ये वाद?
पुण्यात धंगेकरांसाठी ठाकरेंची सभा काँग्रेसमध्ये वाद?