पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका – आढळराव पाटील
शिरूर मतदारसंघातील पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न तसेच वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी हजारो कोटींचा निधी लागणार आहे यासाठी केंद्रातल्या सत्तेत बसणारा खासदार म्हणून तुम्ही मला निवडून दिले तर हे प्रश्न सुटतील, विकासकामे मार्गी लागतील, समोरच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका करुन माझी बदनामी केली जात आहे. मात्र याला जनता मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल असा पलटवार महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केला.पराभव दिसू लागल्याने माझ्यावर खालच्या स्तरावर टीका – आढळराव पाटील
पाच कंदील चौक येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विराट सभा झाली यावेळी आढळराव पाटील बोलत होते. यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले,”ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे. या निवडणूकीत आपण आपल्या देशाचे पंतप्रधान ठरवणार आहोत. येथे खरी लढत विकासपुरुष नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहेत.परंतू कुठल्याही व्यक्तीला विचारले तर पंतप्रधान पदासाठी मोदीजीच हवेत असे नागरिक सांगतात. राम मंदिरासारखा आपल्या अस्मितेचा प्रश्न फक्त मोदीजीच सोडवू शकले. 370 सारखे कलम फक्त मोदीजी यांनीच काश्मीरमधून हटविले. मागील 10 वर्षांत अनेक विकासकामे देशात झाली आहेत.
गेल्या निवडणूकीत मी पराभूत होऊनही मी पायाला भिंगरी लावून फिरलो, मोठा निधी मतदार संघात आणला आहे. मी 20 वर्षांत अनेक प्रकल्प मतदार संघात आणून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. 2014-15 च्या दरम्यान आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक वढू आणि तुळापूर येथे करण्याचा 140 कोटींचा विकास आराखडा सादर केला.
400 कोटींचा विकास आराखडा मंजूर करुन घेतला. आता त्याचे कामही सुरु झाले आहे. माझे व तुमचे ड्रिम प्रोजेक्ट पुर्ण करायचे असतील तर आपल्याला सत्तेमधील खासदार निवडून द्यावा लागेल. समोरचा विद्यमान खासदार याने पाच वर्षांत कुठलेही काम केले नाही. हक्काचा निधी या निष्क्रिय खासदारामुळे परत गेला आहे. सध्या माझ्यावर खोटारडे आरोप केले जात आहेत. हे षडयंत्र एखादा बहुरुपीच करु शकतो. पण यावेळी जनता यांना भुलणार नाही. लोकं मला आत्मियतेने सांगतात गेल्या वेळी आमची चूक झाली आता ती आम्ही दुरुस्त करु. असेही आढळराव पाटील यांनी सांगितले
या निवडणुकीनंतर शिरूरच्या चार गावांचा पाणीप्रश्न, जुन्नरच्या आणे पठाराचा पाणीप्रश्न आणि आंबेगावच्या सातगाव पठारचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्यक्रम असल्याचेही आढळराव पाटील यांनी सांगितले. येणाऱ्या 13 तारखेला आपण जागृत राहून मला घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करावे अशी विनंती पाटील यांनी केली.