अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचा आढळरावांना पाठिंबा
महायुतीचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विविध संघटनांचा पाठिंबा वाढू लागला आहे. अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आढळराव यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले आहे. महासंघाचे संस्थापक प्रल्हाद गुळाभिले यांच्या सूचनेवरून हा पाठिंबा देण्यात आल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश लोकसभा प्रभारी अनिल ताके पाटील यांनी नमूद केले.अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचा आढळरावांना पाठिंबा
जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने यापूर्वीच आढळरावांना पाठिंबा दिला असून संघटना आढळराव यांच्या प्रचारकार्यात सक्रिय आहे. तर नुकताच कष्टकरी जनता आघाडीनेही आढळराव यांना पाठिंबा दिला आहे.
कुणबी मराठा महासंघाने महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, विकासाचे व्हीजन घेऊन २०१४ पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सरकार काम करत आहे. आमच्या संघटनेच्या समन्वयक व अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षा संगीता गुंजाळ यांनी या भागातील सर्व महायुतीच्या उमेदवारांशी मराठा आरक्षण व सगेसोयरे अंमलबजावणीबाबत चर्चा केली आहे. सकल मराठा समाजाच्या प्रश्नावर संसदेत आवाज आपण आवाज उठवाल, ही खात्री झाली आहे. तसेच आपले सरकारच आम्हाला योग्य न्याय देईल, अशा विश्वास आम्हाला आहे.
दरम्यान, रिक्षा चालक, फेरीवाले, धुणेभांडी करणार्या महिला, बांधकाम मजूर यांचे संघटन असलेल्या कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे उर्फ माऊली यांनी देखील आढळराव यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात रिक्षा चालकांचे कल्याणकारी महामंडळ केले. त्यामुळे आमचा २५ वर्षांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
तसेच, जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आढळरावांच्या प्रचारात सक्रीय असून यापूर्वी शिरुर, न्हावरा येथे मोठ्या सभांतून त्यांनी आढळरावांना संघटनेच्या एकजूटीचे बळ दाखवून दिले आहे. संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आढळरावांच्या महाविजयासाठी कष्ट घेत असल्याचे ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.