भोसरीत DCM देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा
शिरुर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी भोसरीत उद्या (दि.१० मे) भोसरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा होणार आहे. त्यानिमित्ताने महायुतीकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही तोफ धडाडणार आहे.भोसरीत DCM देवेंद्र फडणवीस यांची ‘विजयी संकल्प’ सभा
भोसरी विधानसभेतील भाजपाचे आमदार आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचे भाजपा निवडणूक प्रमुख आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसाठी जाहीर सभा आयोजित केली आहे.
भोसरी येथील गावजत्रा मैदानावर शुक्रवारी, दि. १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प सभा होणार आहे. या सभेला महायुतीचे सर्व घटकपक्ष, स्थानिक नेते, पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. ही सभा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी महायुतीकडून कंबर कसली आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना ३७ हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले होते. यावेळी आम्ही महायुतीची वज्रमूठ तयार केली असून, भोसरीतून १ लाख मतांचे लीड देण्याचा संकल्प केला आहे. शिरुरमधील विजयाची सुरूवात भोसरीतून होईल, असा विश्वास आहे.