रवींद्र धंगेकरांनी वक्त बोर्डाचा भूखंड बळकावला? अनिस सुंडकेंचा आरोप
पुणे लोकसभा मतदारसंघात १३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघा एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने सर्वच उमेदवारांकडून जोरदार यंत्रणा राबवली जात आहे. एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी पुण्यामध्ये टिपू सुलतान यांच स्मारक उभारण्याची घोषणा केल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे. यामध्येच आता सुंडके यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.रवींद्र धंगेकरांनी वक्त बोर्डाचा भूखंड बळकावला? अनिस सुंडकेंचा आरोप
मुस्लिम वक्फ बोडीची मालमता काँग्रेसचे पुणे लोकसभा उमेदवार आणि आमदार रविंद्र धंगेकर यांनी शहर महापालिकेतील अधिकाऱ्यांना हताशी धरून संगनमताने बळकावली असल्याचा आरोप एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी केला आहे. धंगेकरांनी हा भूखंड त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतला असून आता खासगी विकसक उत्कर्ष असोसिएट्सच्या मदतीने त्या ठिकाणी निवासी- व्यावसायिक इमारत बांधली जात असल्याचा आरोपही सुंडके यांनी केला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी झालेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतरच धंगेकरांच्या पत्नी आणि उत्कर्ष असोसिएट्स यांनी हा व्यवहार पूर्ण केला, असा आरोपही सुंडके यांनी केला आहे.
रविवार पेठेत लक्ष्मी रस्त्याजवळ सर्व्हे नंबर 966 हा तब्बल 1 हजार 607 चौरस मीटर क्षेत्रफळ असणारा भूखंड वक्फ बोर्डाची मालमता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो भाडेकराराने देण्यात आला. सन 1947 नंतर कायद्याचा अंग करून वक्फ बोर्डाची ही मालमत्ता बँकेकडे गहाण टाकण्यात आली. बँकेने परस्पर त्याचा लिलाव केला. त्यानंतर गेल्यावर्षीच्या (2023) मार्पच-एप्रिल महिन्यात हा मोक्याचा भूखंड उत्कर्ष असोसिएशनतर्फे भागीदार वृषाली रावसाहेब शेंडगे, प्रतिभा रविंद्र धंगेकर, प्रतिक सुनिल अहीर यांच्या नावे करण्यात आल्याच सुंडके यांनी सांगितलं आहे.
लक्ष्मी रस्त्यावर मोक्याच्या जागी असणाऱ्या या मालमत्तेची बाजारभावाने आजची किंमत करोडो रुपयांच्या घरात आहे. या व्यवहारामुळे मुस्लिम समाजाच्या श्रद्धा दुखावल्या गेल्या आहेत. वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणजे सर्वशक्तीमान अल्लाची देन असते. गरीब, मागास मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी ही मालमत्ता वापरायची असते. मात्र पुण्यासारख्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदारांनीच वक्फ बोर्डाचा अमूल्य भूखंड बड्या महापालिका अधिकाऱ्याशी संगनमत करून बळकावला आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे. त्यामुळे शासनाने या व्यवहाराची काटेकोर चौकशी करून वक्फ बोर्डाची मालमता परत करायला हवी, अशी मागणी देखील सुंडके यांनी केली आहे.
दरम्यान, अनिस सुंडके यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याने राजकीय वर्तुळात याबद्दलची चर्चा चांगलीच रंगली आहे. एका बाजूला मुस्लिम समाज हा काँग्रेसच्या बाजूने राहील, असा दावा नेत्यांकडून केला जातोय. तर दुसरीकडे पक्षाचे उमेदवार धंगेकर यांनी मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या वफ्फ बोर्डाची जमीन लाटल्याचा आरोप झाल्याने त्यांची अडचण वाढताना दिसत आहे. आता रवींद्र धंगेकर या आरोपांना काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.