अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा
अखिल भारतीय मराठा महासंघाने पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा जाहीर केला आहे.अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप, उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, शहराध्यक्ष वैभव शिळमकर, सरचिटणीस मयुर गुजर, महिला प्रमुख आरती मारणे, जयश्री साळुंके, सविता मारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी पाठिंब्याचे पत्र स्वीकारले.
जगताप म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण महायुतीने दिले आहे. राज्यात 1998 साली युतीचे सरकार असताना मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली. त्यानंतर सन 2000 ते 2014 काँग्रसच्या सत्ता काळात महामंडळाचे कामकाज ठप्प झाले होते. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी निधी देऊन महामंडळाचे पुनरुज्जीवन केले. आज 86 हजारहून अधिक मराठा युवकांना या महामंडळाचा लाभ झाला. महायुतीच्या सरकारने विविध खात्यात निवड झालेल्या 2270 मराठा उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. सारथीच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ झाला. आगामी काळात महायुतीच्या माध्यमातून समाजाचे आरक्षण टिकू शकेल या विश्वासाने पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा दिला आहे.
मोहोळ यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपण मराठा समाजाबरोबर असून समाजाच्या प्रगतीसाठी शासन दरबारी सर्वोतोपरी पाठपुरावा करण्याचे आश्वासन मोहोळ यांनी दिले.
महायुतीच्या पाठीशी मराठा समाजाने ठामपणे उभे राहावे, महायुती समाजाला न्याय देईल असा विश्वास समन्वयक संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.