Daily Update

काव्य लेखन करणे सोपे नाही – ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर  

Share Post

काव्य लेखन हा एक महत्वाचा साहित्य प्रकार आहे. कविता ही हृदयातून प्रकट होत असते. आपण सर्वच आपापल्या परीने कधीना कधी कविता करतच असतो. महाकवी व्यास वाल्मिकी पासून आपल्याकडे कवितेची मोठी परंपरा आहे. महाकवी कालीदास, संत ज्ञानेश्वर, तुकाराम या संत कवींपासून मर्ढेकर, कुसूमाग्रज, पाडगावकर, आरती प्रभू, ग्रेस अशी खूप मोठी यादी आहे. मात्र, कविता करणारे सगळेच कवी नसतात तर, मागणी प्रमाणे काव्य पाडणारे हे गीतकार असतात. असे काव्य लेखन करणे सोपे नाही. डॉ. दाक्षायणी पंडित यांच्या काव्य लेखनात लालित्य आणि गेयता असे सगळे गुण दिसतात, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर यांनी व्यक्त केले.काव्य लेखन करणे सोपे नाही – ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर  

डॉ. दाक्षायणी पंडित लिखित “सोबतीला तू” हा गेय कवितांचा संग्रह (समग्र प्रकाशन) प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी लेखक रवींद्र गुर्जर हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे निवृत्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर उपस्थित होते. यांसह कार्यक्रमास समग्र प्रकाशनचे देविदास पाटील व वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार आदी उपस्थित होते.

निवृत्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर म्हणाले, वैद्यकीय पेशा आणि कविता लेखन यांचा तसा तर काहीही संबंध नाही. पण डॉ. पंडित यांनी तो ‘गियर’  बदलण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. त्यांच्या कविता या उस्फूर्त व मानवी भावनांना स्पर्श करतात. 

कवियत्री  डॉ. दाक्षायणी पंडित यांनी यापूर्वी आकाशवाणी, दूरचित्रवाणी आणि विविध वर्तमान पत्रांसाठी वैद्यकीय लेखन केले आहे. तर निवृत्ती नंतर त्यांनी हा काव्यासंग्रह साकारला आहे. या काव्यसंग्रहास दिवंगत ज्येष्ठ लेखक ना. धों. महानोर यांची प्रस्तावना लाभली आहे. याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन यांच्या ‘ॲडव्हेंचर्स ऑफ टाॅम साॅयर’ या कादंबरीचे डाॅ. दाक्षायणी यांनी साकारलेली संक्षिप्त आवृत्तीही (वैशाली प्रकाशन) प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डाॅ. दाक्षायणी यांनी लिहिलेली व स्वरबद्ध केलेली नादमधुर गाणी डॉ. राधिका जोशी यांनी गायली. त्यांना निनाद सोलापूरकर यांनी कीबोर्डवर साथ दिली. या कार्यक्रमास श्रोत्यांनीही उत्तम दाद दिली. 

या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ दिवंगत कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांची प्रास्तावणा लाभली असून त्यामणि त्यात म्हंटले आहे की, या संग्रहातील कविता नवनवे छंद, गीतरचना अशा छंदोमयी आहेत, त्यामुळे वाचताना मजा येते. अशा कवितांसाठी कवीजवळ शब्दभांडार व गीतभांडाराचा ऐवज गणगोतासारखा जवळ असावा लागतो. तो आहे. कुठेही तो ‘टाका’ चुकलेला दिसत नाही. कवितेनं सगळं सांगू नये, नेमकं सांगावं व त्याशिवायच्या अनेक वलयांनी त्याला अलिखित शब्दांच्या दुनियेत कवळून बसावं. कवयित्रीनं अनेक कवितांमधून हे अनुभव गीतबद्ध केलेले आहेत. मराठीतल्या श्रेष्ठ कवींशी नातं सांगणारी ही कविता. कवयित्री अनुकरण न करता स्वतःच्या शब्दांची, अनुभवांची बांधिलकी घेऊन उभी आहे. वेगवेगळ्या अनुभवांनी गच्च भरलेली ही कविता तिचीच आहे, आणि सगळ्यांची आहे.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केतकी पंडित यांनी केले. 

काव्य लेखन करणे सोपे नाही - ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र गुर्जर  
“सोबतीला तू” या कविता संग्रहाचे प्रकाशन करताना (डावीकडून) कवियत्री  डॉ. दाक्षायणी पंडित, निवृत्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, समग्र प्रकाशनचे देविदास पाटील, साहित्यिक रवींद्र गुर्जर, वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार आणि डॉ. राधिका जोशी.