जातीयवाद करुन ज्ञानोबा-तुकोबांचे विचार आपण मारत आहोत-चेतनानंद महाराज
महाराष्ट्रात जो जातीयवाद सुरु आहे, त्यामुळे ज्ञानोबा-तुकोबांचे विचार आपण मारत आहोत. जातीयवाद वाढतोय, त्याला खतपाणी घातले जाते अशाने महाराष्ट्र संपेल परंतु हा विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा यांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे जातीयवाद सारखी कितीही आव्हाने आली तरी ती आपण परतवून लावली आणि समानतेच्या पातळीवर महाराष्ट्र उभा राहिला आहे. ,असे मत श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद््गुरुकृपांकित डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांनी व्यक्त केले.जातीयवाद करुन ज्ञानोबा-तुकोबांचे विचार आपण मारत आहोत-चेतनानंद महाराज
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन व कीर्तन महोत्सवाच्या सहाव्या दिवशी ज्ञानोबा-तुकोबांचे नीतिशास्त्र या विषयावर ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज म्हणाले, कोण कुठल्या जातीत जन्माला आला याच्यावर त्याचे अधमपण ठरत नाही. अपवित्र वाचा आणि ज्याला आचरण धर्म नाही तो अधम आहे, असे तुकोबा सांगतात. त्यामुळे रसाळ वाणी ठेवा.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे चातुर्मास प्रवचन दिवस सहावा -ज्ञानोबा-तुकोबांचे नीतिशास्त्र श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन
ते पुढे म्हणाले, जेथे परोपकार, पुण्य आहे ती निती आहे. जिथे पाप आणि परपीडा आहे ती अनिती आहे. राजहंस जसे दूध आणि पाणी वेगळे करतो, तसे आपण पाप आणि पुण्य वेगळे करायला पाहिजे. आपली दृष्टी निट राहीली तर आपली वासना नियंत्रणात राहील आणि पाप घडणार आहे. कोणाचीही निंदा करु नका कारण निंदा आपले मानसिक बल कमी करते, असेही त्यांनी सांगितले.
प्रवचनात श्री ज्ञानोबा-तुकोबांविषयी इतिहास व परंपरा, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, पंढरी महात्म्य, नीतिशास्त्र, पसायदान याविषयी चेतनानंद महाराज निरुपण करणार आहेत. विश्व माऊली ज्ञानोबाराय व जगद्गुरु तुकोबाराय यांचे जीवन समृद्ध करणारे चरित्र व तत्वज्ञान यानिमित्ताने ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.