पुण्यात धंगेकरांच्या प्रचाराला शिवसेना ठाकरे गटाचा ‘जय महाराष्ट्र’?
पुणे मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. मविआचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्याने पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना रवींद्र धंगेकर यांचा प्रचार थांबवण्याचे आदेश दिल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.पुण्यात धंगेकरांच्या प्रचाराला शिवसेना ठाकरे गटाचा ‘जय महाराष्ट्र’?
मंगळवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जागा वाटप जाहीर करतानाच आमच्यामध्ये एक वाक्यता असल्याचं सांगितलं. परंतु अद्यापही काही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांचा प्रचार करत नसल्याने नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे.
ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुण्याचे मविआचे उमेदवार यांचा प्रचार थांबवण्याच्या सूचना शिवसैनिकांना केल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे महाविकास आघाडी सर्वकाही आलबेल नसल्याचं पुढे आलं आहे.
या सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात सुप्त संघर्ष सुरू आहे. दोन्हीकडील नेत्यांनी यावरून जाहीररीत्या एकमेकांवर टीका देखील केली. ही सर्व परिस्थिती निवडणुकीत पुढे येत असल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाचे उमेदवाराच्या प्रचार केला जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.