सत्पुरुषाच्या भेटी शिवाय जीवनाचा उद्धार नाही-ह.भ.प.उमेश महाराज दशरथ
मानवाला सतत बदल अपेक्षित असतो. बदल म्हणजे आहे? तर त्या स्थितीपासून खाली येणे म्हणजे पतन आणि वर जाणे म्हणजे उद्धार. माणसाने नेहमी वर जाणारा बदल पहावा. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात पतन आणि उद्धार दोन्ही संगतीनेच होतो. शहाण्या माणसाने अधमाचा त्याग करुन सत्पुरुषाची संगती करावी. मात्र सत्पुरुषाच्या संगती सहज मिळत नाही त्यासाठी श्रम करावे लागतील. सत्पुरुषाच्या भेटीशिवाय जीवनात परिवर्तन आणि उद्धार नाही, असे प्रतिपादन ह.भ.प. उमेश महाराज दशरथे (मानवत परभणी) यांनी केले.सत्पुरुषाच्या भेटी शिवाय जीवनाचा उद्धार नाही-ह.भ.प.उमेश महाराज दशरथ
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ह.भ.प. उमेश महाराज दशरथे म्हणाले, परिस्थितीवर मनस्थितीतीने मात करता येते. जीवनात संत साधकाला परिस्थितीतून बाहेर काढून त्याची मनस्थिती उंचावतात. संत साधकाच्या जीवनात आमूलाग्र बदल करतात. संतांच्या जीवनातून आपल्याला सकारात्मकता मिळते, यालाच परिवर्तन म्हणतात. गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने आहे त्या परिस्थिती समाधानी राहण्याचे सूत्र मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
महोत्सवात दररोज सायंकाळी ५.३० वाजता अनुक्रमे देहू गाथा मंदिर येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, आळंदी साधक आश्रमाचे ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, जळगावचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अहिरेगावचे ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे हे कीर्तन करणार आहेत. महोत्सवाला प्रवेश खुला असून कीर्तनाचा भाविकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी केले आहे.