NEWS

‘झिम्मड पाऊस गाण्यातून’ श्रोत्यांनी अनुभवल्या पावसाच्या विविधरंगी छटा

Share Post

‘आला भरुन पाऊस’ ही डॉ.अरुणा ढेरे यांची रचना… ‘नभ उतरू आलं’ …‘जिंदगी भर नही भुलेगी’…‘नैनोमें बदरा छाए’ ‘आज रपट जाये तो’ ही विविध ढंगी गाणी आणि गायक संगीतकार निखिल महामुनी यांनी सादर केलेले “भेट नाही पावसाची होत हल्ली” या पावसाच्या विविध छटा उलगडणाऱ्या ‘झिम्मड पाऊस गाणी’ कार्यक्रमात सुरेल श्रावणसरीत प्रेक्षक चिंब भिजले.’झिम्मड पाऊस गाण्यातून’ श्रोत्यांनी अनुभवल्या पावसाच्या विविधरंगी छटा

आरव पुणे निर्मित, झिम्मड पाऊसगाणी हा सुपरिचित हिंदी-मराठी गाणी, कविता-नवी गाणी असा कार्यक्रम सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरात झाला. आरव संस्थेच्या वतीने सभागृहात येणा-या प्रत्येक रसिक श्रोत्याचे स्वागत कागदी होडी, छत्रीची छोटी प्रतिकृती आणि झाडांच्या बिया देऊन करण्यात आले. डॉ. सुनील काळे, डॉ. कल्याणी मांडके, राहुल राठी, चंद्रशेखर पाटील, गायक अतुल खांडेकर, प्रकाश भोंडे या सन्माननीय उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सुनील काळे यांनी मनोगत व्यक्त करत सर्व कलाकारांचे विशेष अभिनंदन केले.

डॉ. अनुराधा गोगटे यांनी सादर केलेलं ‘नभ उतरू आलं’ या गाण्याने कार्यक्रमाची अतिशय सुंदर सुरुवात झाली,ज्याला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये दाद दिली. निखिल महामुनी यांनी पाठोपाठ सादर केलेलं ‘रिमझिम गिरे सावन’ या गाण्याला प्रेक्षकांनी दाद दिली. रेखा पाटणकर यांनी सादर केलेलं ‘झिमझिम झरती श्रावणधारा’ हे गाणं रासिकांना गतकाळामधल्या स्मृतींच्या हिंदोळ्यावर घेऊन गेले.

सुशांत कुलकर्णी यांनी सादर केलेलं ‘लगी आज सावन की’ हे गाणं प्रेक्षकांना वेगळ्या भाव विश्वात घेऊन गेले. “हल्ली” या शब्दाला गेयता नाही,नाद नाही त्यामुळे हा शब्द काव्यात घेऊन दर्जेदार गाणं बनणार नाही अशी नकारात्मक चर्चा झाल्यावर हे आव्हान स्विकारत निखील यांनी संगीतबद्ध केलेली कवयित्री स्वाती शुक्ल यांनी लिहिलेली “भेट नाही पावसाची होत हल्ली” ही रचना विषेश प्रभावी ठरली. ‘काली घटा छाये’ हे डॉ. अनुराधा यांनी सादर केलेल्या गाण्याने पावसाच्या एका वेगळ्याच रंगाचे दर्शन घडविले. निखिल महामुनी आणि डॉ. अनुराधा यांनी सादर केलेल्या ‘चिंब पावसानं रानं झालं’ या गाण्याला प्रेक्षकांनी वन्स मोअर देत पसंती दर्शवली.

निखिल महामुनी यांच्यासोबत अनुराधा गोगटे, रेखा पाटणकर, सुशांत कुलकर्णी, श्रीया निखिल महामुनी आणि नुकत्याच एका आगामी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलेल्या ऋचा महामुनी या सगळ्यांचे हृदयस्पर्शी गाणे आणि उत्तम काव्य, दर्जेदार संगीत आपल्या ओघवत्या,अर्थवाही,हलक्या-फुलक्या तरीही प्रभावी शैलीने रसिकां पर्यंत पोहोचविणारे विजय पाटणकर यांचे निवेदन यामुळे ही ‘आरव’ पुणे निर्मित ‘झिम्मड पाऊसगाणी’ ही मैफिल अधिक रंगतदार झाली.

गिरीश महामुनी,ओंकार पाटणकर,ऋतुराज कोरे,पराग जोशी या नामवंत वादक कलाकार सहभागी झाले होते. हेमंत उत्तेकर यांनी ध्वनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पोतदार यांनी केले.

'झिम्मड पाऊस गाण्यातून' श्रोत्यांनी अनुभवल्या पावसाच्या विविधरंगी छटा
‘झिम्मड पाऊस गाण्यातून’ श्रोत्यांनी अनुभवल्या पावसाच्या विविधरंगी छटा