वक्फ’चा भूखंड बळकावण्याच्याधंगेकरांच्या प्रयत्नाला चपराक
आमदार रविंद्र धंगेकर यांनी राजकीय प्रभाव टाकून वक्फ बोर्डाची मालमत्ता बळकावल्याची तक्रार नुकतीच पुण्यातल्या मुस्लिम नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे केली होती. त्याची दखल घेत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील सीटीएस नंबर ९६६/१ या भूखंडावर चालू असणारे बांधकाम ताबडतोब थांबवण्याचा आदेश बुधवारी ( ८ मे) दिला. या कामासाठी देण्यात आलेले कमेन्समेन्ट सर्टिफिकेट देखील ताबडतोब रद्द करण्यात यावे. या संबधी केलेली कार्यवाही कळवण्यात यावी, असाही आदेश वक्फ बोर्डाने पुणे महापालिकेच्या आयुक्तांना दिला आहे. वक्फ बोर्डाच्या या स्टे आदेशानुसार महापालिकेने हे बांधकाम थांबवावे आणि सबांधितांवर कारवाई करावी अशी विनंती एआयएमआयएम उमेदवार अनिस सुंडके यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन केली आहे.वक्फ’चा भूखंड बळकावण्याच्याधंगेकरांच्या प्रयत्नाला चपराक
रविवार पेठेतील लक्ष्मी रस्त्यानजीक सीटीएस नंबर ९६६/१ हा तब्बल १ हजार ६०७ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. या मोक्याच्या भूखंडावर प्रतिभा रविंद्र धंगेकर आणि त्यांच्या भागीदारांनी बेकायदेशीरपणे निवासी व व्यावसायिक कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरु केल्याची तक्रार करण्यात आली होती.
“वक्फ बोर्डाच्या आदेशामुळे कोट्यवधी रुपयांचा भूखंड बळकावण्याच्या धंगेकरांच्या प्रयत्नांना चपराक बसली आहे. या भूखंडाचा विक्री व्यवहार कसा झाला, या भूखंडावरील निवासी-व्यापारी कॉम्प्लेक्सच्या बांधकामास महापालिकेच्या बांधकाम विभागाने कोणत्या कायद्याने परवानगी दिली, या प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांचा सहभाग या सर्व प्रकाराची आता चौकशी होईल. दोषींना तुरुंगात जावे लागेल,” अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी व्यक्त केली. मुस्लिम समाजाच्या मालकीची कोट्यवधींची मालमत्ता वाचवण्यात यश आल्याचे समाधान आहे, असेही सुंडके म्हणाले. वक्फ बोर्डाच्या मालमत्ता या मुस्लिमांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक प्रगतीकरता वापरल्या जातात. वक्फ कायद्यानुसार वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची विक्री, हस्तांतरण, गहाण ठेवणे यास मनाई करण्यात आली आहे. असे कृत्य करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तरतूद असून संबंधिताला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे. तरीदेखील वक्फ बोर्डाचा भूखंड नियमबाह्य पद्धतीने भाडेकराराने देण्यात आला. सन १९४७ नंतर कायद्याचा भंग करुन ही मालमत्ता बँकेकडे गहाण टाकण्यात आली. बँकेने परस्पर त्याचा लिलाव केला. त्यानंतर गेल्यावर्षीच्या (२०२३) मार्च-एप्रिल महिन्यात हा मोक्याचा भूखंड उत्कर्ष असोसिएशनतर्फे भागीदार वृषाली रावसाहेब शेडगे, प्रतिभा रविंद्र धंगेकर, प्रतिक सुनिल अहीर यांच्या नावे करण्यात आला.
गेल्यावर्षी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतरच रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी आणि खासगी विकसकाने हा व्यवहार पूर्ण केला. त्यामुळे राजकीय वजन वापरून हा व्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. वास्तविक लक्ष्मी रस्त्यावरील सीटीएस नंबर ९६६/१ हा भूखंड डॉ. मोहम्मद खान करीम खान यांनी १६ जानेवारी १९३६ रोजी केलेल्या वक्फ डिडनुसार वक्फ करण्यात आला. तरीही हा भूखंड गहाण टाकणे, विक्री करणे असे प्रकार नियमबाह्य पद्धतीने झाले होते. वक्फ बोर्डाच्या आदेशामुळे त्यास स्थगिती मिळाली आहे.