समता भूमी विस्तारीकरण आणि राष्ट्रीय स्मारकाचे काम जलदगतीने व्हावे – शहराध्यक्ष श्री.दीपक मानकर
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुणे शहरातील महात्मा फुले पेठ येथे असलेल्या निवासस्थान समता भूमी विस्तारीकरण आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारकाचे काम जलदगतीने व्हावी यासाठी बैठकीचे आयोजन करणे, तसेच पुणे शहरातील सर्व नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई करणे आणि आपत्कालीन व्यवस्था सज्जतेबाबत, सध्यस्थितीत सुरु असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करणे, प्रभागातील मुलभूत सुविधा जसे पाणी पुरवठा, सार्वजनिक शौचालय,ड्रेनेज, पावसाळी लाईन दुरुस्ती करणे, नागरिकांच्या विविध प्रश्न या संदर्भात पुणे मनपा आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांची भेट घेत विस्तृत चर्चा करत निवेदन दिले.समता भूमी विस्तारीकरण आणि राष्ट्रीय स्मारकाचे काम जलदगतीने व्हावे – शहराध्यक्ष श्री.दीपक मानकर
सदरप्रसंगी दीपक मानकर यांनी सांगितले, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार यांनी महात्मा फुले पेठ येथील समता भूमीला भेट देत अभिवादन केले. यावेळी समता भूमी विस्तारीकरण व राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला फारसी गती मिळालेली नाही हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तिथे उपस्थित असलेले पुणे मनपा आयुक्त श्री. राजेन्द्र भोसले यांना सूचना केल्या. पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या देशाची अस्मिता असलेले क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. पुण्यातील बुधवार पेठेतील तात्याराव भिडे वाड्यामध्ये ही शाळा सुरू झाली. पुणे शहरातील गंज पेठ येथे असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या निवासस्थान फुले वाडा हा परिसर समता भूमी म्हणून ओळखला जातो. फुले दाम्पत्याच्या जयंती आणि स्मृतीदिनी राज्य आणि देशातून माळी समाजासह विविध जाती धर्माचे लोक त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी समता भूमीत मोठ्या संख्येने येत असतात. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी असून येणाऱ्या नव्या पिढी समोर त्या कार्याची माहिती दिली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘समता भूमी’चे विस्तारीकरण करण्याची आणि फुले वाडा-सावित्रीबाई फुले स्मारक जोडण्याची वारंवार मागणी केली गेल्याने समता भूमीच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या कामाला चालना देण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे स्मारकाच्या व दोन्ही वास्तू जोडण्याच्या कामास गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक याच्यामध्ये अंदाजे शंभर मीटरचे अंतर आहे. या विस्तारीकरणामध्ये करावे लागणारे भूसंपादन व इतर अत्यावश्यक गोष्टींची पूर्तता होण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, जागामालक, स्थानिक नागरिक यांची एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात यावे आणि या वास्तूचे जतन व्हावे आणि त्याची डागडुजी करून ऐतिहासिक वारसा जपला जावा, यासाठी आपले प्रशासन निश्चितपणे या वारशाकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहील याची खात्री आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाईंची शिकवण तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तसेच जुन महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये मान्सून दाखल होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात पुणे शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचणे, रस्त्यांवर खड्डे पडणे यासारख्या समस्या निर्माण होतात. पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुणे शहरातील सर्व नाले, पावसाळी गटारांची सफाई, गाळ काढणे ही कामे होणे अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी खड्ड्याची पाहणी करून या खड्ड्याची तातडीने डागडुजी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून टास्क फ़ोर्स तयार करून पुणे शहरातील सर्व नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई आणि आपत्कालीन व्यवस्था सज्जतेबाबत उचित कार्यवाही व्हावी. मा.आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबधित विभाग प्रमुखांना पुढील कार्यवाही करणेबाबत सूचना केल्या.
