सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे मानवी दुगधपेढी सेवेची दशकपूर्ती साजरी
सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरीने पुण्यामध्ये मानवी दुगधपेढी सेवेच्या दशकपूर्तीची घोषणा केली आहे. अशाप्रकारे सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरीने नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्मलेल्या बाळांच्या देखभालीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. रोटरी क्लब पुणे प्राईडने त्यांच्या यशोदा मिल्क बँक प्रकल्पाअंतर्गत ही सेवा सुरू केली होती. यामुळे गेल्या दशकभरात ३५०० पेक्षा जास्त प्री-टर्म नवजात बाळांचे जीव वाचले आहेत, स्तनदा मातांनी उदारपणे केलेले दान आणि आमच्या वैद्यकीय टीमचे सातत्यपूर्ण अथक प्रयत्न यामुळे हे शक्य झाले आहे.सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे मानवी दुगधपेढी सेवेची दशकपूर्ती साजरी
भारतात दरवर्षी जवळपास २.३ कोटी मुले जन्माला येतात ज्यापैकी १०% महाराष्ट्रात जन्माला येतात. यातील १३ ते १५% मुले म्हणजेच दरवर्षी जवळपास ३ ते ४ लाख मुले नऊ महिने पूर्ण होण्याच्या आधी जन्माला येतात आणि त्यापैकी साधारणपणे १ लाख मुलांचे जन्माच्या वेळेसचे वजन खूपच कमी असते. पुण्यातील अशी १ ते २% मुले आपला जीव वाचवण्यासाठी फक्त दूध बँकांवरच अवलंबून असतात. पण महाराष्ट्रामध्ये अशा ९० ते ९९% बाळांसाठी दूध बँका उपलब्ध होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना जिवंत राहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. यामुळेच मानवी दुग्ध पेढ्यांची निकड सातत्याने वाढताना दिसत आहे.
सह्याद्रि हॉस्पिटल्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ सुनील राव यांनी गेल्या एका दशकभरात या सेवेच्या संचालनामध्ये आलेली आव्हाने व मिळालेले यश ठळकपणे दर्शवताना सांगितले, “मानवी दुगधपेढी चालवताना अनेक लॉजिस्टिकल आणि आर्थिक आव्हाने येतात. सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी दात्यांच्या काटेकोर तपासणीपासून पाश्चरायजेशन आणि स्टोरेज प्रक्रियांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आणि संसाधनांची आवश्यकता असते. मात्र या आव्हानांवर मात करत आम्ही प्री-टर्म बाळांचे जीव वाचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. या बाळांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील अशा खूपच कमी दुग्धपेढ्याउपलब्ध आहेत, त्यामुळे आमच्या प्रयत्नांचे महत्त्व अजूनच वाढले आहे. पुण्याच्या बाहेर कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये देखील आमच्या सेवांचा विस्तार करण्यात आम्हाला यश मिळाले आहे, याचे श्रेय आमच्या समर्पित मिल्क व्हॅन आणि जास्तीत जास्त ठिकाणी करण्यात येणाऱ्या जागरूकता कॅम्पेन्स यांना जाते. रोटरीकडून मिळत असलेले सहाय्य असे अडथळे दूर करण्यात आणि दात्यांकडून दुधाचा सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित करण्यात फार मोलाचे आहे.” असे ते पुढे म्हणाले.
सह्याद्रि हॉस्पिटल्स मॉमस्टोरीचे निओनॅटॉलॉजी आणि बालरोग विभागाचे संचालक आणि प्रमुख डॉ प्रदीप सूर्यवंशी नवजात बाळांसाठी अमृतासमान असणाऱ्या आईच्या दुधाचे महत्व विषद करताना म्हणाले, “प्री प्री-टर्म बाळांचे आरोग्य खूपच नाजूक असल्याने या बाळांसाठी आईचे दूध अत्यावश्यक असते, त्यांची वाढ व विकास यांना पूरक ठरतील अशी महत्त्वाची पोषके व अँटीबॉडीज या दुधात असतात. प्री-टर्म बाळांची पचनसंस्था पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने हि नवजात बालके फॉर्म्युला दूध नीट पचवू शकत नाहीत, आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. आईच्या दुधातील पोषके नवजात बालकांची रोगप्रतिकार यंत्रणा तयार करण्यासाठी आणि मेंदूच्या निरोगी विकासासाठी गरजेची असतात. अतिशय नाजूक आणि असुरक्षित स्थितीत असलेल्या, सर्व अवयव पुरेसे विकसित झालेले नसलेल्या अशा बाळांसाठी केवळ आईचे दूध संसर्गाचा धोका कमी करू शकते.”
सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये सुरक्षिततेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करण्यासाठी दूध दानाच्या प्रक्रियेमध्ये दात्यांची काटेकोर तपासणी केली जाते. संभाव्य दात्यांची सर्वसमावेशक आरोग्य तपासणी केली जाते, यामध्ये एचआयव्ही, एचबीव्ही आणि एचसीव्ही यासारख्या संसर्गांसाठीच्या तपासण्यांचा समावेश असतो. या तपासण्यांमध्ये काहीही विपरीत आढळून न आल्यास, दान केलेले दूध अतिशय काळजीपूर्वक जमा केले जाते, काटेकोर तापमान नियंत्रणाखाली हे दूध आमच्या फॅसिलिटीमध्ये पोहोचवले जाते. फॅसिलिटीमध्ये हे दूध पोचल्यानंतर याचे पाश्चरायजेशन केले जाते. दुधातून कोणतेही संभाव्य पॅथोजेन्स नष्ट केले जावेत आणि त्याचवेळी दुधातील आवश्यक पोषके जपून ठेवली जावीत, यासाठी हा टप्पा अत्यावश्यक असतो. या प्रक्रियेमध्ये दूध एका विशिष्ट कालावधीसाठी एका विशिष्ट तापमानाला तापवले जाते, आणि त्यानंतर ते वेगाने थंड केले जाते. पाश्चराइज्ड दुधाच्या प्रत्येक बॅचची तपासणी केली जाते, त्यामध्ये कोणताही जंतू संसर्ग नाही याची खात्री करून घेतली जाते. पाश्चराइज्ड केलेले दूध सहा महिन्यांपर्यंत सुरक्षितपणे साठवले जाऊ शकते, त्यामुळे गरजू प्री-टर्म बाळांना ते आवश्यकतेप्रमाणे पुरवले जाऊ शकते.
जास्तीत जास्त मानवी दूध दान केले जावे यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्स एक विशेष मिल्क व्हॅन चालवते. या सुसज्ज व्हॅन मातांच्या घरी जातात व त्यांनी दान केलेले दूध जमा करतात, तसेच महाराष्ट्रातील विविध रुग्णालयांना दुधाचे वितरण करण्यात देखील मदत करतात. सह्याद्रि हॉस्पिटल्समधील मानवी दुगधपेढी उपक्रम ऑगस्ट २०१४ पासून चालवला जात असून हा पुण्यातील पहिल्या काहींपैकी एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील पश्चिम भागांमध्ये या सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. पुण्यामध्ये फक्त काही दुग्धपेढ्या उपलब्ध असून देखील सह्याद्रि हॉस्पिटल्सने आपल्या समर्पित मिल्क व्हॅन्समार्फत प्री-टर्म बालकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि दूध दानाला प्रोत्साहन देण्यासाठी जागरूकता कॅम्पेन चालवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
सह्याद्रि हॉस्पिटल्सने ह्युमन मिल्क बँक प्रोजेक्ट (HMB) चे अध्यक्ष रमेश पुरंधरे आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या अध्यक्षा राधा गोखले यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी दुग्ध पेढीच्या उपकरणांची दिलेली उदार देणगी, त्यांचा या उपक्रमाला असलेला अमूल्य पाठिंबा आणि आज या प्रसंगी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
“प्री-टर्म बाळांचे आरोग्य खूपच नाजूक असल्याने दात्यांकडून दूध मिळण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रत्येक देणगीमुळे लक्षणीय फरक पडत आहे. आम्ही जास्तीत जास्त स्तनदा मातांना दान करण्याचे आवाहन करतो आणि अधिक बाळांचे जीव वाचवण्यात मदत करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. दान करण्यात आलेल्या दुधाचा प्रत्येक थेंब प्री-टर्म बाळांच्या निरोगी भविष्याच्या दिशेने उचलण्यात आलेले पुढचे पाऊल आहे.” असे डॉ. सूर्यवंशी यावेळी म्हणाले.
पायाभूत सोयीसुविधांचा खर्च, देखरेख आणि जागरूकतेचा अभाव अशी आव्हाने असून देखील सह्याद्रि हॉस्पिटल्सचे समर्पित प्रयत्न आणि रोटरीकडून मिळणारे साहाय्य या अडचणी दूर करण्यात महत्त्वाचे ठरत आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमार्फत जास्तीत जास्त नवजात बालकांपर्यंत पोहोचून त्यांचे जीव वाचवण्यात मदत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे जेणेकरून या जगात प्रगती साध्य करण्याची संधी आम्ही त्यांना देऊ शकतो.
