शास्त्रीय गायन आणि तबला वादनाने रंगला ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चा दुसरा दिवस
शास्त्रीय गायिका शाश्वती चव्हाण यांनी सादर केलेली राग मूलतानी’मधील बंदिश व त्याला अभंगाची साथ, विदुषी देवकी पंडित यांनी सादर केलेली राग रागेश्री’तील बंदिश आणि तबला वादक अक्रम खान यांच्या सोलो तबलावादनाच्या सादरीकरणाने ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवशी पुणेकरांनी एक स्वरमयी संध्याकाळ अनुभवली.
कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाउंडेशन यांच्यावतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे आयोजन भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर, औंध येथे करण्यात आले आहे.शास्त्रीय गायन आणि तबला वादनाने रंगला ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवा’चा दुसरा दिवस
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात शास्त्रीय गायिका शाश्वती चव्हाण यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मूलतानी मधील ‘गोकुल गाम..’ ही बंदिश सादर केली. या बंदिशीला रसिकांकडून भरभरून दाद मिळाली. त्यानंतर सादर झालेल्या ‘पंढरीचे भुत..’ या अभंगाने तर पं. भीमसेन जोशी रंगमंदिर भक्ती भावाने भरून गेले होते. यावेळी गायिका शाश्वती चव्हाण यांना हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर व तबल्यावर पांडुरंग पवार यांनी साथसांगत केली.
त्यानंतर तबला वादक अक्रम खान यांचे सोलो तबलावादन करण्यात आले. यावेळी त्यांनी त्रिताल पेशकार तालामध्ये अनेक प्रकारच्या ‘गता’ तसेच वेगवेगळ्या घराण्यांच्या बंदिशी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांना हार्मोनियमवर निलय साळवी यांनी संगीतसाथ केली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप विदुषी देवकी पंडित यांच्या गायनाने झाला. सुरवातीला त्यांनी रागेश्री रागातील ‘पलक न लागी..’ ही बडाख्यालमधील बंदिश सादर केली. त्यानंतर छोटा ख्यालमधील ‘मोर मन बस कर लिनो शाम’ ही त्रितालातील बंदिश सादर करण्यात आली. त्यानंतर ‘हे सुरांनो चंद्र व्हा..’ हे गाणे सादर करण्यात आले. यामध्ये रसिक प्रेक्षक तल्लीन झालेले पाहायला मिळाले. तर दिवसाची सांगता भैरवी रागातील ‘अवघा रंग एक झाला..’ या अभंगाने झाली. यावेळी हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर, तर तबला आणि पखवाजवर रोहित मुजुमदार व गंभीर अवचार यांनी संगीतसाथ केल