पीएमपीचा प्रवास होणार आनंददायी – मुरलीधर मोहोळ
जलद, सुरक्षित आणि किफायतशीर पीएमपीच्या सेवेतून पुणेकरांचा प्रवास आनंददायी व्हावा यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.पीएमपीचा प्रवास होणार आनंददायी – मुरलीधर मोहोळ
वानवडी, क्लोव्हर व्हिलेज, गंगा सॅटेलाईट, नेताजीनगर, हौसिंग बोर्ड, साळुंखे विहार या परिसरात मोहोळ यांची प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती. आमदार सुनील कांबळे, बाबू वागस्कर, कालिंदाताई पुंडे, धनराज घोगरे, दिलीप गिरमकर, मकरंद केदारी, दिनेश होले, सागर गव्हाणे, कोमल शेंडकर, सचिन मथुरावाला, तात्या शेंडकर, मारूती भद्रावती, निलेश अशोक कांबळे, दिलीप जांभुळकर, प्रसाद चौघुले, मनोज चोरडिया, निशा कोटा, अतुल वानवडीकर, दिनेश सामल यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहोळ म्हणाले, सार्वजनिक वाहतुकीसाठी देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेस पीएमपीच्या ताफ्यात आहेत. गेल्या पाच वर्षांत पीएमपीला केंद्र सरकारच्या फेम 2 योजनेअंतर्गत 150 ई बसेस मिळाल्या आहेत. अपेक्षित 650 ई बसेसपैकी 473 बसचा वापर सुरू झाला असून, उर्वरित बसेस लवकरच येतील.
शहराच्या चारही दिशांना सहा ई बस चार्जिंग डेपो कार्यान्वित करण्यात आले आहेत. नजिकच्या काळात 500 सीएनजी बसेसची निविदा प्रक्रिया सुरू आहे. इलेक्ट्रिक बसमुळे वहनखर्चात 70 टक्केत तर कार्बन उत्सर्जनात 50 टक्के घट होते. मेट्रो नेटवर्कला फीडर सेवेवर भर देण्यात येणार आहे.
