पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर : मुरलीधर मोहोळ
‘खेळाडू हा कोणत्याही देशाचा कणा असतो. ज्या देशातील खेळाडू सशक्त आणि समाधानी, तो देश अधिकाअधिक प्रगती करू शकतो, असा माझा विश्वास असून देशभरात क्रीडा क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ हे आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी मैलाचा दगड ठरले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातही विविध क्रीडा प्रकारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन पुण्याला क्रीडानगरी करण्याचे ध्येय गाठणार असून पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना व्यक्त केला.
पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे भविष्य कसे असावे, याबद्दल चर्चा करण्यासाठी पुणे स्पोर्ट्स असोसिएशन आणि सर्व फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोहोळ बोलत होते. ‘खेळाडू म्हणून स्वत:ला घडविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, याची मला जाणीव आहे. ते करताना अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्याची जबाबदारी मी सातत्याने घेत आलो आहे. यापुढे अधिक जोमाने घेईल, त्यासाठी कोणताही खेळाडू कुठेही अडता कामा नये,’ अशी ग्वाहीही मोहोळ यांनी दिली.
‘पुण्याने राज्याला आणि देशालाही अनेक खेळाडू आजवर दिले आहेत. ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याचे नाव मोठे केले अशा खेळाडूंचे मार्गदर्शन घेत पुण्याची क्रीडा संस्कृती आणखी जोमाने पुढे नेण्याचाही आमचा प्रयत्न असणार आहे’, असेही मोहोळ म्हणाले.
छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे, डॉ. दीपक माने, शैलेश टिळक, विलास कथुरे, डॉ. पी. जी. धनवे यांनी या कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते. शैलेश टिळक यांनी सर्व खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना खेळाडूंनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. त्याला सर्व खेळाडूंच्या वतीने ऑलिंपियन मनोज पिंगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठिंबा असल्याचे सांगितले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या खेळाडूंसाठी संदेश पाठवला होता. ‘सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेच; पण तुम्हीदेखील भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळावे, यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. ते तुम्ही करीत आहात याची मला पूर्ण खात्री आहे. २०२९ साली होणाऱ्या युथ ऑलिम्पिकसाठी आपण प्रयन्त करतच आहोत, पण ते पुण्यात व्हावे यासाठी देखील आम्ही कसोशीने प्रयत्न करू. मुरलीअण्णांच्या नेतृत्वात पुण्यात होणाऱ्या सर्व प्रकारच्या खेळांसाठी आम्ही पूर्णपणे मदत करू,’ असे त्यांनी संदेशात म्हटले होते
रेखा भिडे, अंजली भागवत, शांताराम जाधव, डॉ. दीपक माने या मान्यवर खेळाडूंनीही मनोगत व्यक्त केले. अरविंद पटवर्धन यांनी आभार मानले.
नामवंत खेळाडूंची हजेरी…
अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात पार पडलेल्या या कॉन्क्लेव्हसाठी ३२ विविध प्रकारच्या खेळांतील नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यात राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारप्राप्त नेमबाज अंजली भागवत, ऑलिंपियन मनोज पिंगळे, रेखा भिडे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर, गौरव नाटेकर, संदीप किर्तने, श्रीरंग इनामदार, एस. द्रविड, ध्यानचंद पुरस्कार विजेते अभिजित कुंटे, नितीन किर्तने, २०११ चे मिस्टर युनिव्हर्स किताब विजेते महेश हगवणे, जीवनगौरव पुरस्कारप्राप्त रमेश विपट, भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी विकी बांकर यांच्यासह १६५ छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा समावेश होता.