मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सर्वात अगोदर सुरू केली. पक्षाच्या दुसऱ्याच यादीत मुरलीधर मोहोळ याचे नाव जाहीर करण्यात आले. घोषणा झाल्यानंतर मोहोळ यांनी ग्रामदेवतांच्या दर्शनाने प्रचाराला सुरूवात केली. या देवदर्शनापासूनच त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांनी निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसले. त्यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या साथीने भेटीगाठी सुरू केल्या. त्यामुळे सुरूवातीपासूनच मोहोळ यांच्या प्रचाराच्या धुरा ‘होम मिनिस्टर’ सांभाळले असल्याचे अधोरेखीत झाले.मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !
- मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग
- ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मोनिका मोहोळ यांनी शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघातील मान्यवर, आजीमाजी नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली. गेल्या पंधरा दिवसात त्यांनी मतदारसंघात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीगाठी दरम्यान शक्य झाले तिथे त्या नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या घऱी जाऊन भेटी घेत आहेत. निवडणूक प्रचाराबद्दल कार्यकर्त्यांची मत काय आहे हे त्यांनी जाणून घेतली. उन्हापासून बचाव करत प्रचार आणि पक्षाचे काम करा असे सांगत आहेत.आपल्याला १३ मेपर्यंत ही लढाई लढायची असल्याने आपण आजारपणामुळे प्रचारापासून दुर रहाणार नाही याची काळजी घ्या, काही मदत लागली तर सांगा असे आवर्जून सांगत होत्या.
या पहिल्या प्रचाराबद्दल मोनिका मोहोळ म्हणाल्या, ‘मी महापालिकेत नगरसेविका म्हणून काम पाहिले आहे. या पाच वर्षात मला समाजकारण आणि लोकांची कामे करण्याचे स्वातंत्र्य देत मुरलीधरआण्णांनी मला एकप्रकारे प्रशिक्षणच दिलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुढे कधीतरी सहभागी व्हावेच लागणार होते, मग सुरूवातीपासूनच का आपण यात सहभागी होऊ नये ! म्हणून या अनुभवाच्या जोरावरच मी सुरूवातीपासूनच प्रचारात सक्रिय होण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे स्वतंत्रपणे भेटीगाठी घेतल्या.
‘मला जवळपास पाच निवडणुकींचा अनुभव असून तो अनुभव आज महत्त्वाचा ठरत आहे. भेटीगाठींमधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनसामान्यांच्या विश्वासाची साक्ष पदोपदी मिळत आहे. मी जवळपास सहाही विधानसभा मतदारसंघात जाऊन आले. यापुढेही पक्षाच्या वतीने जसे नियोजन असेल तसे प्रचारात सहभागी होणार असल्याचेही मोनिका यांनी स्पष्ट केले.
पुणे लोकसभेचे मतदान १३ मे यादिवशी मतदान होणार आहे.त्यात उन्हाचा कडाका वाढत असताना मोहोळ यांच्या भेटीगाठी वाढल्या असून महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराच्या नियोजनाची लगबग सुरू आहे. गेले काही दिवस रोज शहरातील मान्यवरांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकांच्या भेटीगाठी घेण्याचे काम मुरलीधर मोहोळ व त्यांच्या होम मिनिस्टर या स्वतंत्रपणे करत आहेत. मधेच संस्था किंवा समाजांच्या मेळाव्याला उपस्थित रहात असून समाजबांधवांशी संवाद साधत आहेत.