लोकांना आमच्याबद्दल विश्वास पावसातही प्रतिसाद देत आहेत-अजित पवार
शिरूर लोकसभा मतदारसंघात आज प्रचाराची सांगता होणार आहे. शुक्रवारी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या हडपसर, कोंढवा भागातील रोड शोला भर पावसातही मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आम्ही शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलोय. पावसात भिजायची सवय आहे. कधी ऊन, वारा, पाऊस काम करत राहायचं याच ध्येयाने आम्ही काम करत असतो, हा आमच्या बद्दलचा विश्वास लोकांना आहे म्हणून लोक पावसातही प्रतिसाद देत आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचे रोड शोमध्ये ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत केले. कोंढवा, लुल्लानगर, साळुंखे विहार, कौसरबाग, कात्रज गावठाण, कात्रज चौक, सुखसागरनगर, कोंढवा बुद्रुक नगर, गोखलेनगर या परिसरातून हा रोड शो करण्यात आला. मोठ्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते दुचाकींवर तसेच चारचाकी वाहनांतून या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.
आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, ज्येष्ठ नेते जालिंदर कामटे, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, नंदाताई लोणकर, संजय लोणकर, आरती बाबर, मनीषा कदम, वीरसिंग जगताप, वृषाली कामठे, अभिमन्यू भानगिरे, सतपाल पारधे, रोहन गायकवाड, सुप्रिया शिंदे, सुनील कामठे आदी यावेळी उपस्थित होते.