पुण्याचे व्हिजन अन् धंगेकरांनी वेळ मारून नेली !
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धगेकर आणि वंचित आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाचे. या तीनही उमेदवारांनी त्यांच्या दृष्टिकोनातून “पुण्याचं व्हिजन” काय आहे यांची मांडणी केली. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ व वसंत मोरे यांनी पुण्याच्या त्यांच्या व्हीजनबद्दल सविस्तर मांडणी केली. मात्र, मविचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी त्यांचे ‘व्हीजन’ न सांगता केवळ टीका करत वेळ मारून नेली.पुण्याचे व्हिजन अन् धंगेकरांनी वेळ मारून नेली !
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तीनही उमेदवारांच्या एकत्रित वार्तालापाचे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी यावेळी उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ त्यांचे व्हीजन सांगताना गेल्या दहा वर्षात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेली देश पातळीवरची कामे. आणि भाजपा सरकारच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघात झालेली कामे याचा आढावा घेतला. खासदार झाल्यानंतर त्यांचे व्हीजन काय असेल याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, माझे पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर असावं, असा प्रयत्न असणार आहे. पूर्वी केंद्रात राज्यात आणि पालिकेत एकच सत्ताधारी होते. त्यावेळी त्यांनी पुढच्या ५० वर्षांचा विचार केला नाही, असं वाटतं. कागदावरची मेट्रो आम्ही सत्यात आणली. आधीच्या राजकारण्यांनी कामाची फक्त उद्घाटन केली, कामं केली नाहीत. असे ते म्हणाले.
वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. पीएमपीएल बसेस वाढवाव्या लागतील. शहरात मेट्रोचा विस्तार करणं गरजेचं आहे. रिंग रोड पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. नदी प्रकल्प पूर्ण करणे. पुरंदरचं विमानतळ करावं लागेल. नवी मुंबई ते पुण्याला विमानतळ रेल्वे मार्गाने जोडण्याचा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ पुणे शहर करणं गरजेचं आहे. अनेक नॅशनल रिसर्च सेंटर आणणार आहे. आयआयटीचे सेंटर पुण्यात करता येतील का? पाठपुरावा करून आपण पूर्ण करणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
याप्रसंगी वसंत मोरे म्हणाले, शहरातील वाहतूक कोंडी महत्त्वाची समस्या आहे. शहराच्या चारही बाजूला बस स्थानक होणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट करावी लागेल. पुण्यात पाणी प्रश्न गंभीर आहे. शहरातील पाण्याचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. पुण्याला वेगळं धरण मिळलं गरजेचं आहे. पाणी ,ट्रॅफिक, रस्ते यासाठी जाणकार लोकं असणे आवश्यक आहे. आपल्या नद्यांचं संवर्धन केलं पाहिजे.
रवींद्र धंगेकर यांनी मात्र, पुण्याच्या व्हीजन बद्दल न बोलता मोहोळ यांनी सांगितलेल्या कामांवर टीका टिप्पणी करत केवळ वेळ मारून नेली. त्यांना त्यांच्या व्हीजन बद्दल पत्रकारांनी विचारल्यानंतरही त्यांनी केवळ मोहोळ यांनी सांगितलेल्या पुणे शहरातील योजनांमध्ये कशा त्रुटी आहेत याबद्दलचा पाढा वाचला, मोहोळ यांनी त्याला आक्षेप घेत तुम्ही तुमचे व्हीजन सांगा वैयक्तिक टिक्का टिप्पणी करू नका असे सांगूनही धंगेकरांनी त्यांचे व्हीजन न सांगता केवळ वेळ मारून नेली.