कलाकृती कलाकारापेक्षा दीर्घायुषी असते वासुदेव कामत यांचे मत
चित्रकार कलेच्या माध्यमातूनच आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकार कलाकृती साकारत असतो तोपर्यंतच ती त्याच्या मालकीची असते. एकदा का त्याने तिच्यावर सही केली ती सार्वजनिक होते. इतिहासात कायमच योगदानाची नोंद राहते व्यवहाराची नाही. कारण, कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त आयुष्य घेऊन जन्मते, त्यामुळे कलाकाराने केवळ व्यवहारावर भर न देता योगदानावर भर द्यावा व अखेरीस शांती व तृप्ती रसाचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी केले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव असणाऱ्या “कारी-२०२४” निमित्ताने राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजित ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ स्विकारल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी, प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाच्या कार्यकारी संचालक सौ.ज्योती ढाकणे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मिलिंद ढोबळे, डाॅ.आनंद बेल्हे, डाॅ.अश्विनी पेठे आदी उपस्थित होते
कामत यांनी आपल्या अमोघ वाणीतून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ते पुढे म्हणाले, आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण मी अप्लाईड आणि फाईन आर्टिस्ट आहे, असे सांगतो. परंतू माझ्या मते आपले कलाकार असणे आणि त्यापेक्षाही आपल्यातील कला’कारी’ अधिक महत्त्वाची असते. कला ही मनुष्याच्या अंतापर्यंत साथ देते, आणि ज्याला कलेची आवड आहे, त्यालाच मनुष्य म्हटले जाऊ शकते. प्रा.डाॅ.चक्रदेव यावेळी म्हणाले, ‘कारि’ म्हणजे, काहीतरी नाविण्यपूर्ण घडविणे. ज्यामध्ये कविता, कलाकृती, चित्र, फोटो, तंत्रज्ञान, चित्रपट अशा प्रत्येक गोष्टीचा अंतर्भाव होऊ शकतो. एमआयटी एडीटी विद्यापीठाचा कॅम्पस मुळात अनेक कलाकृतींचा संगम असून जेथून अनेक कलाकार घडत आहेत.
विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली, ज्याचे सुत्रसंचालन स्नेहा वाघटकर यांनी केले.