शाश्वत विकासासाठी बौद्धिक संपदा पूरक – प्रा.गणेश हिंगमिरे
पेटंटसारख्या बौद्धिक संपदा या संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत पूरक आहेत, त्याचा फायदा जगभरातील देशांनी घ्यावा, असे मत पेटंटविषयक तज्ज्ञ प्रा. गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केले. शाश्वत विकासासाठी बौद्धिक संपदा पूरक – प्रा. गणेश हिंगमिरे
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस पुणे विद्यापीठाच्या वतीने बौद्धिक संपदा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हिंगमिरे बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रसाद खांडेकर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन कुलकर्णी, बीएमसीसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शाश्वत विकासासाठी बौद्धिक संपदा पूरक – प्रा.गणेश हिंगमिरे
हिंगमिरे म्हणाले, ‘माणसांसाठी आणि जगासाठी शांतता प्रस्थापित करणे आणि समृद्धी निर्माण करणे हे संयुक्त राष्ट्रसंघाचे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे. त्यासाठी पेटंटबरोबरच भौगोलिक चिन्हांकन जीआय ही बौद्धिक संपदा महत्त्वाची आहे. जीआयमुळे पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या शेतीजन्य पदार्थांना किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी मंडळींकडून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंना जीआय मानांकन मिळते.’
हिंगमिरे पुढे म्हणाले, ‘युरोपात साठ हजार जीआय नोंदी झाल्या आहेत. चीनमध्ये जवळपास अकरा हजार नोंदी आढळतात. भारतात ही संख्या सातशेच्या आसपास आहे. जीआय हा पूर्णपणे पर्यावरणपूरक आणि समूहाचा बौद्धिक संपदा अधिकार असल्याने त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसह संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये साध्य होऊ शकतात. त्यासाठी शालेय स्तरापासून पेटंटसारखे विषय शिकवावेत आणि विद्यापीठात बौद्धिक संपदेच्या नोंदी करण्यास प्रोत्साहन द्यावे.’