श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे चातुर्मास प्रवचनमालेला प्रारंभ
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन झाले. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित प्रवचनमालेत दिनांक ९ आॅगस्ट पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता श्री क्षेत्र भंडारा डोंगर जगद््गुरुकृपांकित डॉ.पंकज उर्फ चेतनानंद महाराज यांचे श्री ज्ञानोबा-तुकोबांविषयी विविध विषयांवर प्रवचन होणार आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे चातुर्मास प्रवचनमालेला प्रारंभ
उद््घाटनप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पवार, अप्पा रेणुसे, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रवचनात श्री ज्ञानोबा-तुकोबांविषयी इतिहास व परंपरा, मानसशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, पंढरी महात्म्य, नीतिशास्त्र, पसायदान याविषयी चेतनानंद महाराज निरुपण करणार आहेत. विश्व माऊली ज्ञानोबाराय व जगद्गुरु तुकोबाराय यांचे जीवन समृद्ध करणारे चरित्र व तत्वज्ञान यानिमित्ताने ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
उल्हास पवार म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वसा घेऊन भागवत तत्वज्ञान सामान्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न अशा उपक्रमांतून केला जात आहे. मानवतेचे तत्वज्ञान अनेक संतांनी मांडले आहे. तेच तत्वज्ञान ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित सप्ताहात रसाळ वाणीतून मांडले जाणार आहे.
प्रास्ताविकात ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने म्हणाले, गेली ४० वर्षे चातुर्मासाचे औचित्य साधून ट्रस्टतर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मानव सेवेचे महामंदिर उभारत असताना सामाजिक उपक्रमांसोबतच चातुर्मासात प्रवचन, कीर्तन देखील आयोजित केले जाते. दिनांक ३ ते ९ आॅगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० ते ८ यावेळेत चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार देखील कीर्तन सादर करणार आहेत.
शनिवारपासून (दि. ३ आॅगस्ट) अनुक्रमे परळी वैजनाथ येथील ह.भ.प. भागवताचार्य तुकाराम महाराज मुंडे, परभणी मानवत चे ह.भ.प. उमेश महाराज दशरथे, मराठवाडयातील विदर्भ रथ ह.भ.प. रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर, देहू गाथा मंदिर येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले, आळंदी साधक आश्रमाचे ह.भ.प. यशोधन महाराज साखरे, जळगावचे ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अहिरेगावचे ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे हे कीर्तन करणार आहेत. महोत्सवाला प्रवेश खुला असून प्रवचन, कीर्तनाचा भाविकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी केले आहे. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.