अमोल कोल्हे फक्त खोटं बोलण्यातच पटाईत – आढळराव पाटील
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्याचा प्रचार रविवारी थंडावला. आता चौथ्या टप्यात असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराने वेग घेतला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ‘डॉ. अमोल कोल्हे फक्त बोलण्यातच पटाईत आहेत,’ अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे. अमोल कोल्हे फक्त खोटं बोलण्यातच पटाईत – आढळराव पाटील
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे आयोजित स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. या प्रसंगी शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, विष्णु हिंगे, कल्पना आढळराव, अरुण गिरे, सुनील बाणखेले यांच्यासह महायुती मधील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ‘आपल्या वाकचातुर्याने लोकांवर भुरळ पाडून फक्त धादांत खोटे बोलून काहीही संबंध नसलेले आरोप करण्याची काहींची प्रवृत्ती आहे. ‘पुणे-नाशिक महामार्गावर खेडपासून आळेफाट्यापर्यंत सहाही बायपास केल्याचे श्रेय घेण्याचे काम विद्यमान खासदारांनी केले; परंतु त्यानंतर संबंधित खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी याकामाचा पाठपुरावा मी केल्याचे सांगितल्याचे सर्वश्रुत झाल्यानंतर या विषयावर त्यांनी बोलणे बंद केले,’ अशा शब्दांत आढळराव यांनी कोल्हेंवर टीका केली.
दरम्यान, *गेल्या वीस वर्षांमध्ये मी शिवसेनेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमावेत माझा संघर्ष झाला, तो संघर्ष इतका टोकाचा नव्हता. त्याचबरोबर वीस वर्षांपूर्वी वळसे पाटील यांच्यासमवेत माझे खूप जवळचे संबंध होते. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केल्यामुळे मने जुळण्यास अडचण निर्माण झाली नाही असेही शिवाजीराव आढळराव पाटलांनी सांगितले.