Daily Update

लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड

Share Post

उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. लांडे यांची नाराजी दूर करण्यात आढळरावांना यश आल्यास त्यांच्या ते पथ्यावर पडणार आहे. महायुतीचा धर्म पाळल्यास भोसरीतून आढळरावांना मोठे मताधिक्य मिळेल असे राजकीय गणित जाणकारांकडून मांडण्यात येत आहे.लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड

महायुतीमधील अजित दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिरूरसाठी उमेदवारी मिळेल असा आडाखा माजी आमदार विलास लांडे यांनी बांधला होता. दरम्यानच्या काळात उमेदवारीवरून राजकीय घमासान झाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाबत मतदारसंघ विजयी होण्यासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले

त्यामुळे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना उमेदवारी देखील बहाल करण्यात आली. या निर्णयामुळे भोसरीचे चाणक्य असलेले विलास लांडे नाराज झाले. उमेदवारी आढळरावांना जाहीर झाल्यापासून ते राजकीय विजनवासात गेल्याचे चित्र होते. माध्यमांना त्यांनी त्यानंतर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच राजकीय सार्वजनिक कार्यक्रमांना दांडी मारण्यास त्यांनी सुरुवात केली.

भोसरी विधानसभेत तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. या मतदारसंघात असणारे विलास लांडे हे महत्वाचे आणि मोठे नेते आहेत. लांडे नाराज झाले तर त्याचा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो याची जाणीव आढळराव पाटील यांना आहे.

त्यामुळे त्यांनी भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविलयातील कार्यालयात जाऊन लांडे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध माध्यमांना प्रतिक्रिया देताना लांडे यांची नाराजी दूर झाल्याचे नरेटिव्ह तयार करण्याचे काम आढळराव पाटील यांनी केले. सोशल मीडियावर देखील लांडे आणि आढळराव यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. ही चर्चा आढळरावांना सकारात्मक ठरेल असे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो पाहणे रंगतदार ठरणार आहे.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे यांना ९० हजार मते पडली आहेत. त्यांचा पराभव झाला खरा. मात्र त्यावेळी त्यांच्या राजकीय खेळ्या चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या. अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना त्यांनी अजित दादांची मनधरणी करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अर्ज भरायच्या पाच मिनिटे आधीच माघार घ्यायला लावली. थेट चिन्हावर आणि पक्षावर न लढताही त्यांनी वरिष्ठांचा आशीर्वाद आपल्या बाजूने ठेवण्याची किमया केली होती. त्यांच्या या राजकीय खेळ्या अनेकांच्या अडचणीच्या ठरू शकतात याची जाणीव आढळराव पाटील यांना होती. त्यामुळे आधीच भेट घेऊन त्यांची मनधरणी करत लांडे यांची ताकद आपल्या बाजूने ठेवण्याची गरज आढळरावांना देखील निर्माण झाल्याची चर्चा आहे.

लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड
लांडेंच्या भेटीतून आढळरावांचे पारडे जड