३६ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ४२.१९५ कि.मी. मार्गाची AIMS कडून मोजणी पूर्ण
येत्या ४ डिसेंबर रोजी आयोजित 36 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या ४२.१९५ कि.मी. नव्या मार्गाची मोजणी काल रात्री ११ ते रात्री ३ या वेळात पार पडली. असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन अण्ड डिस्टेंस रेसेस (AIMS)चे रूट मेजरर अमीर श्यामदिवाण यांनी ही अधिकृत मोजणी पूर्ण करून मार्गाच्या अचूकते बद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, जॉइंट रेस डायरेक्टर रोहन मोरे व गुरबंस कौर , टेक्निकल चेअरमन वसंत गोखले, स्पंजिंग आणि फीडिंग प्रमुख कुमार उपाध्याय, पत्रकार श्रीराम शिंदे, समन्वयक नरेंद्र सिंग व उमेश जाधव, चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाचे विद्यार्थी वॉलंटियर्स, ’सरहद’ संस्थेचे वॉलंटियर्स हे या मार्ग मोजणीत सहभागी झाले होते. ‘सायकल कॅलिब्रेशन’ या पद्धतीने अतिशय अचूकतेने ही मोजणी करण्यात आली. आता पुढील पाच वर्षापर्यंत हा स्पर्धा मार्ग अधिकृत असणार आहे.
सणस मैदानातून सुरु होणारी ४२.१९५ कि.मी.ची ही मॅरेथॉन सारसबाग – सिंहगड रस्ता – नांदेड सिटी – आतील सर्कलला वळसा घालून पुन्हा सिंहगड रस्त्याने – सारसबाग व सणस मैदान ही पहिली फेरी आणि पुन्हा याच मार्गाने दुसरी फेरी असा ४२.१९५ किमीचा हा यंदाच्या ‘नाईट मॅरेथॉन’चा नवा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या मार्ग मोजणी वेळी मार्गावरील डॉक्टर व नर्सेस, पाणी व एनर्जी ड्रिंक्सचे पॉइंट्स, पोलीस, एंबुलेंसच्या जागा ,स्ट्रीट लाईट्स, एलईडी बोर्डस आदि बाबतीत सखोल अभ्यास केला गेला तसेच या ‘नाईट मॅरेथॉन’मध्ये अचानक उदभवू शकणार्या संभाव्य अडथळ्यांवर सविस्तर चर्चा केली गेली.
याप्रसंगी टेक्निकल रेस डायरेक्टर बाप्टीस्ट डिसूजा यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, ‘पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखान्याच्या दहा बाय दहा अशा छोट्या खोलीमध्ये पुणे मॅरेथॉनचा खर्या अर्थाने जन्म झाला. पहिल्या मॅरेथॉनचा मार्ग आखताना व पूर्ण मॅरेथॉनचे ४२.१९५ किलोमीटर अंतर मोजताना आम्ही चक्क ५० फूट लांबीचा टेप वापरला होता. त्यानंतर पुढच्या वर्षांपासून १०० फूट लांबीची लोखंडी साखळी वापरून या मार्गावरील रस्त्यावर आम्ही मोजणी करायचो. एक मीटर परिघाच्या चाकाचाही वापर केला. कालांतराने आमच्या मोजमाप पद्धतीत सुधारणा होत गेली आणि इंटरनॅशनल स्टॅन्डर्सच्या सायकल कॅलिब्रेशन पद्धतीचा वापर करून संपूर्ण मार्ग मोजला जात राहिला.’
ही मार्ग मोजणी रात्री चालू असताना मार्गावर अनेक नागरिकांनी थांबून या मार्ग मोजणीची माहिती उत्सुकतेने घेतली व ही मॅरेथॉन अचूक कि.मी.ची व्हावी यासाठी पदाधिकारी करत असलेल्या प्रयत्नांच्या बद्दल गौरोद्गार काढले.