29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

३४ व्या पुणे फेस्टिव्हलचे मा. नितीन गडकरी व मा. देवेंद्र फडणवीस उद्घाटक

Share Post

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिव्हल हा
सांस्कृतिक महोत्सव यंदा ३४वे वर्ष साजरे करीत आहे. याचे उद्घाटन शुक्रवार दि. २ सप्टेंबर २०२२ रोजी
सायंकाळी ५.०० वाजता  केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते व
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे
संपन्न होत आहे. या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मा. मंगलप्रभात लोढा, उच्च व
तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील आणि खा. गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे आहेत. या सोबतच महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील हे देखील या प्रसंगी उपस्थित राहतील.
ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी हे उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवतील.

पुण्याचे नाव जागतिक उद्योग नकाशावर नेणारे व पुणे फेस्टिव्हलशी प्रथम वर्षापासून जोडले गेलेले ज्येष्ठ
उद्योगपती पद्मभूषण (कै.) राहुल बजाज यांच्या पवित्र स्मृतीस यंदाचा ३४वा पुणे फेस्टिव्हल अर्पण
करण्यात आला आहे अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत
दिली. मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, महाराष्ट्र कॉस्मोपौलिटीयन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा
उपाध्यक्षा आबेदा इनामदार आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामडळाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर
हे मंचावर उपस्थित होते.

यंदा पुणे फेस्टिव्हलमध्ये भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पद्मविभूषण पं. शिवकुमार
शर्मा, पद्मविभूषणअभिनेते दिलीप कुमार आणि शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहणारे
कार्यक्रम. यंदा पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘ऑल इंडिया मुशायरा’, अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी यांचा
‘गंगा’ बॅले, अशोक हांडे यांचा ‘आजादी ७५ – आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम, शास्त्रीय गायक राहुल
देशपांडे यांची संगीत मैफिल आणि ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा हे कार्यक्रम श्री गणेश कला क्रीडा रंगमंच
येथे संपन्न होतील. या शिवाय बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे विविध सांस्कृतिक
कार्यक्रम होणार आहेत. बालगंधर्व कलादालन येथे महिलांची चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन, पंडित
जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे उगवते तारे व इंद्रधनू आणि हॉटेल तरवडे क्लर्कस् इन येथे
महिलांची पाककला स्पर्धा, जपानी पुष्परचना व मंगळागौरी खेळ या सोबतच पुणे शहरात विविध
ठिकाणी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी यंदा उद्घाटन सोहळ्यात गणेश वंदना व
दुसरे दिवशी त्यांचा ‘गंगा’ बॅले सादर करणार आहेत. गेल्या ३४ वर्षात सन २००९ मध्ये स्वाईनफ्लू आणि
सन २०२० व २०२१ मध्ये कोरोनामुळे पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम झाले नाहीत. उर्वरित ३१ वर्षांमध्ये
हेमा मालिनी यांनी तब्बल २९ वर्षे पुणे फेस्टिव्हलमध्ये त्यांचा बॅले अथवा गणेशवंदना अथवा शिव स्तुती
सादर केली आहे. त्यांचा नवा बॅले त्या प्रथम पुणे फेस्टिव्हलमध्ये सादर करतात. त्यांच्या कन्या ईशा आणि
अहाना यांच्या नृत्य कारकिर्दीची सुरुवातही त्यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये केली.