23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये क्रीडा स्पर्धांची रेलचेल

Share Post

दरवर्षी प्रमाणे यंदाही ३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण पुणे फेस्टिव्हलचे चेअरमन सुरेश कलमाडी यांनी यावर्षी देखील कायम  राखले आहे. यंदा ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सव काळात होणाऱ्या ३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट (गोल्फ कोर्स, येरवडा), मल्लखांब स्पर्धा (महाराष्ट्र मंडळ, टिळक रोड), डर्ट ट्रॅक रेस (गोळीबार मैदान), महिलांची बॉक्सिंग स्पर्धा (जनरल वैद्य स्टेडीयम), पुणे जिल्हा कुस्ती स्पर्धा (मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल, कात्रज) आणि विंटेज कार रैली (रेसिडेन्सी क्लब) यांचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे फेस्टिव्हल क्रीडा समितीचे प्रमुख प्रसन्न गोखले आहेत.

यंदा संपूर्ण महिलांची बॉक्सिंग स्पर्धा हे पुणे फेस्टिव्हल क्रीडा स्पर्धांमधील आकर्षण ठरेल. ही स्पर्धा शनिवार, दि. ३ सप्टे. रोजी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीयम येथे दुपारी १२.३० वाजता सुरु होऊन सायं. ५.३०ला बक्षीस वितरण संपन्न होईल. यामध्ये ६० महिला बॉक्सर्सचा सहभाग असून ‘लड़की लड़ सकती है’ हे घोषवाक्य त्यासाठी निवडले आहे. मदन वाणी व अन्य चार पंच यासाठी काम करतील. पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन साठी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष रमेश बागवे आणि माजी नगरसेवक व क्रीडा समिती अध्यक्ष अविनाश बागवे यांनी याचे आयोजन केले आहे. याचे बक्षीस वितरण पुणे फेस्टिवलचे सुरेश कलमाडी व रमेश बागवे यांच्या हस्ते संपन्न होईल.

यंदा पुणे फेस्टिव्हल क्रीडा स्पर्धांमध्ये डर्ट ट्रॅक रेसचे तरुणांमध्ये विशेष आकर्षण आहे. रविवार, दि. ४ सप्टे. रोजी गोळीबार मैदान येथे सकाळी ११.०० वाजता सुरु होणारी ही डर्ट ट्रॅक रेस सायंकाळी ५.३० वाजता संपेल. यासाठी १ की. मी. खास ट्रॅक तयार करण्यात आला असून एकूण १३ गटांमध्ये १५० स्पर्धकांनी भाग घेतला आहे. महिला स्पर्धकांचाही विशेष गट आहे. यामध्ये पुण्या बरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, इचलकरंजी येथील स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये रॉयल एनफील्ड बुलेट, टी.व्ही.एस., हिरो होंडा, कावासाकी, बजाज यासह परदेशी बनावटीच्या मोटार सायकल व स्कूटरही आहेत. सायं. ५.३० वाजता पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न होईल. असोसिएशन फॉर रेसिंग अँड मोटर स्पोर्ट्स (आर्म्स)चे  अध्यक्ष किशोर बारास्कर व सहकाऱ्यांनी याचे आयोजन केले आहे.

पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंट येरवडा येथील गोल्फ कोर्स येथे शनिवार दि. ३ सप्टे. रोजी सकाळी ६.३० ला सुरु होऊन दुपारी १२.३० ला बक्षीस वितरण संपन्न होईल. या स्पर्धा स्टेबल फोर्ड कॅटेगरी हँडीकॅप असा प्रकारात गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ डिवीजनमध्ये आयोजित केला आहे. या स्पर्धेत ९५ स्पर्धकांनी भाग घेतला असून यामध्ये पुणे व परीसरातील विविध कंपन्यांचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि काही परदेशी पाहुणे देखील सहभागी होणार आहेत. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न होईल. जयदीप  पटवर्धन आणि ललित चिंचाळकर यांनी याचे आयोजन केले आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या मल्लखांब स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. ३ सप्टे. व रविवार दि. ४ सप्टे. रोजी टिळक रोड येथे महाराष्ट्र मंडळात दोन्ही दिवशी सकाळी १०.०० ते सायं. ४.०० या वेळेत संपन्न होईल. यामध्ये ८ वर्षे ते २० वर्षे वयोगटातील ३०० पेक्षा जास्त मुले व मुली सहभागी झालेल्या असून ८ गटांमधील या स्पर्धा पार पडतील. याचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. ४ सप्टे. रोजी सायं. ५.०० वाजता  सौ. मीरा कलमाडी यांच्या हस्ते संपन्न होईल. याचे संयोजन पुणे जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सचिव अभिजित भोसले व सचिन परदेशी यांनी केले आहे.

महाराष्ट्राची भूषण असणाऱ्या पुणे जिल्हास्तरीयमॅटवरीलकुस्ती स्पर्धांचे आयोजन रविवार दि. ४ सप्टे. रोजी कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलयेथेसकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत संपन्न होतील. यामध्ये ९ वजन गटांमध्ये ६० कुस्तीगीरांनी भाग घेतला असून याचा बक्षीस वितरण समारोप सायं. ५.०० वाजता या स्पर्धांचे संयोजक व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते संपन्न होईल.

यंदा ‘पुणे फेस्टिव्हल कार फिएस्टा’ ही जुन्या मोटारींची विंटेज कार रैली विशेष आकर्षण असणार आहे. रविवार दि. ४ सप्टे. रोजी सकाळी ९.३० वाजता रेसिडेन्सी क्लब येथून ही रैली सुरु होईल. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी रैलीला हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये ऑस्टिन,रोल्स रॉयस, शेवरलेट, वोक्सवैगन, फोर्ड, फियाट, मर्सिडीज, बी.एम.डब्लू. इत्यादीबनावटीच्या दुर्मिळ मोटारी असणार असून या जुन्या मोटारींचे मालक व त्यांचे कुटुंबीय पारंपारिक पोशाखांमध्ये सहभागी होतील. रेसिडेन्सी क्लब येथून निघालेली ही रैलीपुणे कॅम्प,सर्दन कमांड, बंडगार्डन असा १० की. मी.चा प्रवास पूर्ण करून सकाळी ११.३० वाजता रेसिडेन्सी क्लब येथे परत येईल. पुणे फेस्टिव्हल चे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न होईल. याचे संयोजन  महाराष्ट्रऑटोमोटिव स्पोर्ट्सअसोसिएशनचे श्रीकांत आपटे यांनी केले आहे.