२८ अॅाक्टोबरपासून ‘बेबी ऑन बोर्ड’ प्रेक्षकांच्या भेटीला
हल्ली प्रेग्नेंट ही फक्त होणारी आईच नसून होणारे बाबाही असतात. म्हणूनच तर म्हणतात ना ‘वी आर प्रेग्नेंट’. या नऊ महिन्यांचा आनंददायी प्रवास ते एकत्र करतात. मग तो व्यायाम असो, डाएट असो, डॅाक्टरची व्हिजीट असो किंवा मग डोहाळे जेवण असो. असाच गोड अनुभव पाहायला मिळणार आहे सागर केसरकर लिखित, दिग्दर्शित ‘बेबी अॅान बोर्ड’मध्ये. नुकताच या सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून यात प्रतिक्षा मुणगेकर आणि अभिजीत आमकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत ‘बेबी ऑन बोर्ड’ या सीरिजमध्ये सिद्धार्थ आणि श्रुती यांच्या नात्याला फुटणारी नवी पालवी त्यांच्या आयुष्यात विविध बदल घडवताना दिसत असून प्रेग्नेंसीमध्ये श्रृतीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून सिद्धार्थची धडपड, काळजी यात दिसत आहे. तिचे डाएट सांभाळण्यापासून ते डॅाक्टरकडे चेकअपला जाताना दीड लिटर पाणी पिऊन जायचे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्याचे लक्ष आहे आणि हे सगळे सांभाळताना या दोघांमध्ये होणारी लुटूपुटूची भांडणे सीरिजमध्ये अधिकच धमाल आणत आहेत. ही एक कौटुंबिक सीरिज असून ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
‘बेबी अॅान बोर्ड’बद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ही एक धमाल सीरिज आहे. हलक्याफुलक्या विनोदाने भरलेली ही सीरिज प्रेक्षकांना विशेषतः तरूणाईला जास्त जवळची वाटेल. हल्लीच्या कपल्समध्ये प्रेग्नेंसीचा प्रवास एकत्र असतो आणि हा प्रवास ते मनापासून त्यांच्या पद्धतीने एन्जॅाय करतात. प्रेक्षकांना नेहमीचं काहीतरी मनोरंजनात्मक हवं असतं आणि प्रेक्षकांची हीच अपेक्षा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. हा आशयही असाच आहे. सर्व कुटुंबानं एकत्र पाहावी, अशी ही सीरिज आहे.’’
साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष या सीरिजचे निर्माते असून अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत. ‘बेबी ऑन बोर्ड’ २८ अॅाक्टोबरपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.