23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

२२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान – डॉ. जब्बार पटेल

Share Post

२२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ जानेवारी ते २५
जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आल्याची आणि महोत्सवातील जागतिक स्पर्धा
विभागातील चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार
परिषदेत केली. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात यावर्षी ५१ देशांमधून  आलेले १४० हून अधिक चित्रपट दाखविले जाणार आहेत. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते आदी मान्यवर व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. यावेळच्या चित्रपट महोत्सवाचे सूत्र ‘चित्रपट एक आशा’ (सिनेमा इज अ होप) हे असल्याचे आणि त्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या चित्राचे यावेळी माहिती देण्यात आली.


या महोत्सवातील चित्रपट यावेळी सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील
पीव्हीआर आयकॉन (६ स्क्रीन), कॅम्प परिसरातील आयनॉक्स (३ स्क्रीन) आणि औंध
भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपट गृहात (२ स्क्रीन) या तीन ठिकाणी एकूण
११ स्क्रीनवर दाखविले जाणार आहेत. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी
अधिक २ स्क्रीन उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया शुक्रवारी २३ डिसेंबरपासून www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार असून, चित्रपटगृहांवर स्पॉट रजिस्ट्रेशन प्रक्रिया ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. रसिक
प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठी नोंदणी शुल्क रुपये ८००
फक्त आहे. यावर्षी ६८ देशांतून ११८६ चित्रपट महोत्सवासाठी दाखल झाल्याचे आणि त्यांपैकी १४० हून
अधिक चित्रपटांची महोत्सवासाठी निवड झाल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले.
महोत्सवासाठी निवड झालेल्या व जागतिक स्पर्धा विभागातील १४ चित्रपटांची घोषणा या
वेळी करण्यात आली.