२१ व्या ‘पिफ’मध्ये उलगडल्या राज कपूर यांच्या आठवणी
‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘राम तेरी गंगा मैली’ अशा लोकप्रिय चित्रपटांच्या चित्रीकरणाचे विविध किस्से, राज कपूर यांच्या व्यक्तिमत्त्वातील लहरीपणा, मेहनत, त्यांचे खाद्य पदार्थाबाबतचे प्रेम आणि माणुसकी असे अनेकविध पैलू आणि चित्रपट निर्मितीच्या विविध तंत्रांचा प्रवास उलगडून दाखवत सुप्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांनी राज कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला.पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या २१ व्या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आयोजित ‘मास्टर क्लास’मध्ये रवैल यांनी आज उपस्थितांशी संवाद साधला. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन या ठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्वाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, महोत्सवाच्या चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते आदी उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. पटेल यांनी रवैल यांची मुलाखत घेतली.मूळचे ७१ वर्षीय रवैल यांनी प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक राज कपूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली होती. त्यांनी १९८० साली ‘गुनेहगार’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट सृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. ‘अर्जुन पंडित’, ‘और प्यार हो गया’, ‘अंजाम’, ‘जो बोले सो निहाल’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.कार्यक्रमात राज कपूर यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना रवैल म्हणाले , ” मी १६ वर्षांचा होतो. आपल्याला पुढे न्यूक्लिअर फिजिक्स शिकायचे असे ठरवले होते. त्यावेळी ऋषी कपूर माझ्याकडे आले आणि मला बोलले राज कपूर हे सर्कस चित्रपटाचे चित्रीकरण आहेत. तिकडे खूप साऱ्या रशियन मुली आहेत तेही छोटया कपड्यांमध्ये, तू तिकडे गेले पाहिजे. हे ऐकून मी पण कुतूहलापोटी तिकडे गेलो. पण तिथे गेल्यावर मी जे पाहिले, त्यातून रशियन मुलींना पूर्णपणे विसरून गेलो. सर्कसच्या त्या जवळपास ५००० लोकं असलेल्या सेटवर राज कपूर हे एकट्याने सर्वांना सांभाळत होते. अतिशय सहजतेने पण तितक्याच प्रभावीपणे ते सर्व करत होते, ते पाहून मी अचंबित झालो आणि त्याचवेळी त्यांच्यासोबत काम करायचे असा निश्चय केला.”राज कपूर यांच्या ‘डंबारा नाईटस ‘ बद्दल बोलताना रवैल म्हणाले, “डंबारा नाईटस हा एक असा प्रसंग असत, ज्यावेळी राज कपूर हे आपल्या खाजगी थिएटरमध्ये बसून आपल्या चित्रपटांच्या आवडत्या सीन्सच्या चित्रफिती पुन्हा पुन्हा बघत असत. चित्रपटात त्यांनी वापरलेले तंत्र, चित्रकरणाचे विविध पैलू अशा अनेक गोष्टींचे ते बारकाईने निरीक्षण करत. मी देखील त्यांच्यासोबत बराच वेळा त्या ठिकाणी उपस्थित असत. या नाईटसमधून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.”राज कपूर यांच्या चित्रपटात संगीत हे अतिशय महत्वाचा भाग होता. चित्रपटातील संगीत हे त्याच्या कथेला साजेसे असावे हे ते नेहमी मानत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील संगीत हे अधिक प्रभावी ठरते. गाण्याच्या रेकॉर्डींग वेळीदेखील त्यांच्या डोक्यात त्या गाण्याच्या प्रतिमा अतिशय स्पष्ट असत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमात रोहन प्रकाशनतर्फे राहुल रवैल यांनी लिहिलेल्या ‘राज कपूर – दि मास्टर अॅट वर्क ‘ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. जब्बार पटेल आणि सिनेमाटोग्राफर व दिग्दर्शक शाजी करुन यांच्या हस्ते हे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेकर आणि पुस्तकाचे अनुवादक मिलिंद चंपानेरकर हे उपस्थित होते.
