२१ जुलैला उडणार ‘अफलातून’ धमाल
जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशी वाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा, चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पट कथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे. ‘पेईंग गेस्ट’, ‘धमाल’, ‘ऑल द बेस्ट’, ‘पोस्टरबॅाईज’, ‘टोटल धमाल’ या हिंदी चित्रपटांच्या लेखनासोबतच टिव्ही मालिका, नाटकांसाठी लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन करणाऱ्या परितोष पेंटर यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार झाला आहे.
डिटेक्टिव्ह म्हणून काहीतरी वेगळे करू इच्छिणारे तीन मित्र. त्यातल्या एकाला बघता येत नाही, एकाला ऐकू येत नाही आणि एक बोलू शकत नाही. त्यांच्यातील या कमतरतेमुळे त्यांची नेहमीच फटफजिती होते. मात्र ते डगमगत नाहीत तर परिस्थितीला सामोरे जात एकत्र उभे ठाकतात. आपल्यातील ही मैत्री जपत एका फसवणुकीचा हे तीन मित्र कसा निकाल लावतात? याची धमाल दाखविणारा ‘अफलातून’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झालाय.