‘हीलिंग हार्मनी’आस्था फाऊंडेशन प्रस्तुत व कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजन
डॉक्टर आणि पेशंट यांनी एकत्रितपणे सादर केलेला आस्था फाऊंडेशन प्रस्तुत आणि कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित हीलिंग हार्मनी हा सांगीतिक कार्यक्रम गुरुवार, दिनांक ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाटयगृह येथे होणार आहे. कर्करोगावर मात करुन २० ते २५ वर्षे आपले आयुष्य हसत खेळत जगणा-या महिला व प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ.शेखर कुलकर्णी सादरीकरण करणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनच्या चैत्राली अभ्यंकर यांनी दिली.प्रख्यात कर्करोगतज्ज्ञ डॉ.शेखर कुलकर्णी यांची संकल्पना असून समाजसेविका अनघा चितळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रतिभा कर्णिक, स्वाती देव, माधवी फडणीस, चैत्राली अभ्यंकर आणि डॉ.शेखर कुलकर्णी यांचा कार्यक्रमात सहभाग असणार आहे. बदलत्या जीवनशैलीचा धमाल कार्यक्रम म्हणून याची ओळख आहे. उम्मीद संस्थेच्या सहयोगाने हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमात हिंदी-मराठी गीते, आरोग्यदायी सकारात्मक उर्जा देणा-या गप्पा आणि विविध अनुभव मांडण्यात येणार आहेत. डॉक्टर आणि रुग्ण यांनी एकत्र सादर केलेला जगातील हा पहिला सांगीतिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे १५० हून अधिक प्रयोग झाले असून पुन्हा एकदा नव्या रूपात हा कार्यक्रम रसिकांसमोर येत आहे. कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.