हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४ ची जल्लोषात सांगता
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समृद्ध वारश्याची साक्ष देणारा ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ थाटामाटात पार पडला. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाला राज्य आणि देशभरातून २५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती निमित्त या महोत्सवाची सुरुवात दि. 17 फेब्रुवारी रोजी संस्कृती आणि इतिहासाचे केंद्र बनून नटलेल्या जुन्नर शहरात झाला. उद्घाटनाचा दिवस किल्ले शिवनेरी येथे महादुर्ग फोर्ट वॉक यासोबत ॲडवेंचर झोन आणि झिपलाईन एरिना मधील साहसी प्रात्यक्षिके, ऐतिहासिक वारसा दाखवून देणारा किल्ले जुन्नर येथील हेरिटेज वॉक, बुट्टे पाटील मैदानात वसलेल्या फूड डिस्ट्रिक्ट मधील मन तृप्त करणारा असा खाद्य महोत्सव, साहस आणि आराम यांचा संगम साधणारा टेन्ट सिटी आणि वॉटर स्पोर्ट्स तसेच बुट्टे पाटील मैदानातील सभास्थळी होत असलेले सांस्कृतिक कार्यक्रम यांनी भारून गेला. शाहीर सुरेश जाधव यांची पोवाडा स्वरूपातील ‘शिवमहावंदना’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्र गाथा असलेले आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा’ हे उद्घाटन सोहळ्याचे विशेष केंद्रबिंदू ठरले.
दि.18 आणि 19 फेब्रुवारी रोजी देखील स्वराज्य महोत्सव 2024 मध्ये विविध उपक्रम आणि अनुभव पहायला मिळाले ज्यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची साक्ष दिली. उत्साहवर्धक मॅरेथॉन स्पर्धा, ॲडवेंचर झोन मधील प्रात्यक्षिके, मनमोहक हेरिटेज वॉक आणि विस्मयकारक सांस्कृतिक सादरीकरणांचा आस्वाद उपस्थित पर्यटकांना घेता आला. महोत्सवाचा प्रत्येक दिवस हा अविस्मरणीय आणि रोमांचक असा सोहळाच ठरला. यात भर पडली ती पाहुणे आणि पर्यटक यांना वेगळा अनुभव देणाऱ्या कृषी पर्यटनाची.