23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘हर हर महादेव’मध्ये अमृता खानविलकर साकारणार ‘ही’ भूमिका

Share Post

झी स्टुडिओज निर्मित ‘हर हर महादेव’ चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, शरद केळकर बाजीप्रभूंच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. या चित्रपटातील अजून एक अत्यंत महत्वाचे आणि ताकदीचे पात्र म्हणजे सोनाबाई देशपांडे यांचे. सोनाबाईंची भूमिका कोण साकारणार हे गुपित आता उघड झाले आहे. ज्यांच्या नावाने बारा मावळ दणाणतात, असे बाजीप्रभू देशपांडे आणि ज्यांच्या नावाने बाजीप्रभू देशपांडे दणाणतात अशा सोनाबाई आहेत.

फक्त मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या कर्तृत्वशैलीने नाव कमावणारी बहुगुणी अभिनेत्री अमृता खानविलकर खंबीर सोनाबाईंची भूमिका साकारणार आहे. ‘हर हर महादेव’ हा अमृताचा पहिलाच ऐतिहासिक चित्रपट आहे. अमृताने अनेक चित्रपटांतून एकापेक्षा एक भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवली आहे. दिलखेचक अदांनी घायाळ करणारी भूमिका असो किंवा नृत्य अमृता नेहमीच चर्चेत राहिली आहे. आपण अमृताला नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत पाहिले आहे. यावेळेस ती करारी अशा सोनाबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. मावळ मधील स्त्रियांचा अभिमान म्हणजे सोनाबाई. प्रेमळ तरी वेळ पडता पतीचा कान पिळणाऱ्या अशा सोनाबाईंची भूमिका निभावणं काही सोपं नाही. अशा एका वेगळ्या भूमिकेत अमृताला पाहाण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

भारताचा इतिहास प्रत्येकाला कळावा, म्हणून एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच विविध भाषांतून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स’ची आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे.