29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

हर घर सावरकर समिती महाराष्ट्र शासन यांच्यावतीने “गणपती आरास स्पर्धा 2023” चे आयोजन

Share Post

मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आणि महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभलेल्या “हर घर सावरकर समिती” च्या वतीने अखिल महाराष्ट्र “गणपती आरास स्पर्धा 2023” चे आयोजन करण्यात आले आहे. 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या समग्र जीवनावर आधारित आरास, देखावे सादर करायचे आहेत.

या स्पर्धेत कौटुंबिक, सोसायटी, मित्रमंडळ, शाळा तसेच सार्वजनिक मित्रमंडळ अशा विविध स्तरांवर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये स्पर्धक भाग घेऊ शकतात. विविध विभागातील विजेत्या स्पर्धकांना 15 लाखांपेक्षा अधिक रक्कमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत, ज्यामध्ये अंदमानची सहल, इलेक्ट्रिक स्कुटर, टिलर ट्रॅक्टर, 54″ एलईडी टिव्ही, रेफ्रिजरेटर, सोलर वॉटर पंप, मायक्रोवेव्ह ओव्हन, सायकल, डिनर सेट तसेच इंडक्शन शेगडी यांसारख्या विविध बक्षिसांचा समावेश आहे.

“हर घर सावरकर समिती, महाराष्ट्र शासन” यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि कार्य घराघरात पोहोचविण्यासाठी “हर घर सावरकर” अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 मे 2023 रोजी किल्ले रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली व त्यानंतर विविध शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. वर्षभर सुरू राहणाऱ्या “हर घर सावरकर” या अभियाना अंतर्गत ही “गणपती आरास स्पर्धा 2023” आयोजित करण्यात आली आहे. “या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक गुगल फॉर्म आणि QR कोड हर घर सावरकर समितीच्या https://www.facebook.com/HarGharSavarkar या फेसबुक पेजवर 19 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तसेच स्पर्धेचे नियम व अटी यासुद्धा तेथे पाहायला मिळणार आहेत” अशी माहिती समितीचे पदाधिकारी देवव्रत बापट यांनी दिली. तसेच अधिक माहितीसाठी यशवंत अकोलकर (94220 04653) यांना संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.