हनुमान जयंती निमित्त एमआयटीत कुस्तीचे आयोजन
वायुपुत्र हनुमानाची रोजची उपासना, व्यायाम आणि पौष्टिक आहारामुळे मल्ल तयार होतात. ज्यांच्या जिभेला स्वादाची सवय आहे तो कधीही मल्ल बनू शकत नाही. त्यासाठी शरीर आणि मनाने मजबूत बनावे. एमआयटीने लाल मातीतील सुरू केलेल्या कुस्ती स्पर्धेतील विजेता भविष्यात हिंद केसरी, भारत केसरी, रुस्तम ए हिंद , महाराष्ट्र केसरी व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक करेल.” असे विचार काशी बनारस येथील ज्येष्ठ तत्वज्ञ व विचारवंत डॉ. योगेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केले.
श्री हनुमान जयंती निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या आखाड्यात विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी तर्फे पुयातील पैलवानांसाठी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
स्पर्धेत ९० पैलवानांनी सहभाग घेतला. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. ७० किलो वजनी गटात अनुदान चव्हाण आणि प्रणव गरूडकर यांच्यात सलामीची लढत झाली. ज्यात एमआयटी डब्ल्यूपीयूचा अनुदान चव्हाण विजयी झाला.
विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात असलेल्या श्री हनुमान मंदिरात महापूजा केली. यानंतर कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, आळंदी देवस्थान ट्रस्टचे माजी विश्वस्त रामचंद्र गुहाड, सरकार निंबाळकर, डॉ. टी.एन.मोरे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक व पंच प्रा. विलास कथुरे, डॉ. पी.जी. धनवे, राहुल बिराजदार, बाळासाहेब सणस, अशोक नाईक व रोहित बागवडे उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“कुस्तीमुळे ताकद आणि रणनीती विकसित होते. विद्यार्थ्यांनी व्यायामा सोबत अभ्यास करावा. प्रत्येक कुस्तीगीरांचे चारित्र्य संवर्धन घडविले जाते. बुध्दी आणि शक्तीच्या जोरावर कुस्ती क्रीडा प्रकारात यश मिळविता येते”
पै. निखिल वणवे, नीलेश सातपुते आणि विनायक इंगूळकर हे पंच होते.

विजेता उपविजेते
खुला गट ओम घावरे तेजस मारणे
८६ किलो आकाश घोडके सुमित शिंदे
७४ किलो भानुदास मते वरद उमरदंड
७०किलो अनुदान चव्हाण प्रणव गरूडकर
६५ किलो बालाजी गायकवाड किरण चव्हाण
६१ किलो विठ्ठल पवार सौरभ उभे
५७ किलो यश झुंजुरके प्रशांत जोरी
५४ किलो ओंकार पोळेकर सोहम जोरकर
४६ किलो अथर्व इंगूळकर ऋषी घारे
४२ किलो अथर्व वासवंड संग्राम सपकाळ
३३ किलो राजवर्धन शिंदे गणेश मते
सामन्यातील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे बाल कुस्तीपटूंचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
प्रा.विलास कथुरे यांनी सूत्र संचालन केले. प्रा.डॉ. पी.जी. धनवे यांनी आभार मानले.
