स्वातंत्र्य दिना निमित्त कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील शिवाजीनगर भागातील महात्मा गांधी वसाहत,पाटील इस्टेट समोर या परिसरातील सुमारे साडेतीनशे हून अधिक घरांमध्ये महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.
पुण्याचे पॅड मॅन अशी ओळख असलेल्या योगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांविषयक आरोग्य जनजागृती करण्यासाठी दुर्गम,झोपडपट्टी अशा भागात सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येत आहे.आज या उक्रमाअंतर्गत पुण्यात सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले. यावेळी पुण्याचे पॅड मॅन योगेश पवार,ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले,पूजा वाघ,प्रियंका मिसाळ,अंजली रघुनाथ वाघ,अर्चना माघाडे,रोहित गोडबोले,श्वेता ओव्हाळ,तेजस रायभार,डॉ मनोज देशपांडे,ऍड स्वप्नील जोशी,अविनाश भेकरे,सनी कारोसे,हिरा शिवांगी,मोहन कोळी,सिलो घाडगे, जगदीश परदेशी,नितीन गायकवाड,महात्मा गांधी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आदी मान्यरांनी घरोघरी जाऊन वाटप केले.
या उपक्रमाबद्दल बोलताना योगेश पवार म्हणाले, मासिक पाळी या अतिशय महत्वाच्या आणि नाजुक विषयांवर जनजागृती करण्याचे काम कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून आम्ही डॉक्टर्स चा चॅरिटी फॅशन शो घेतला होता त्या अंतर्गत १ लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येणार आहे. त्यातील ४० हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप आजपर्यंत पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागात करण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले म्हणाले, ग्रामीण तसेच शहरी भागातही बहुतांश कुटूंबात आजही मासिक पाळी विषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे या काळातील महिलांची शारीरीक व मानसिक स्थिती समजून घेतली जात नाही असे दिसते. या पार्श्वभूमीवर कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने मासिक पाळी दरम्यानची स्वच्छता विषयी जनजागृती करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचा एक भाग होता आले याचा आनंद वाटतो.