17/07/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘स्प्लॅश २३ ग्रुप शो’  कला प्रदर्शनाच्या दुसऱ्या सत्राला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

Share Post

रोमार्टिकाच्या स्प्लॅश ‘२३ ग्रुप शो’ने दुसऱ्या सत्रात प्रवेश केला. १५ एप्रिल पासून  सुरु झालेले हे प्रदर्शन एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनांतर्गत मलाका आर्ट गॅलरी, पुणे येथे दहा उदयोन्मुख कलाकार त्यांच्या अप्रतिम कलाकृतींचे प्रदर्शन करत आहेत. शैली आणि विषयांचे वैविध्य यांचा विचार केला तर हे प्रदर्शन अद्वितीय आहे. अजिंक्य डी वाय पाटील महाविद्यालयाच्या लिबरल आर्ट्स विभाग प्रमुख  केदार नाईक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.


या प्रदर्शनामध्ये केतकी फडणीस यांनी आपल्या आधुनिक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट्स कलाकृती या अमूर्त अभिव्यक्तीवाद आणि फौविझमचे यांच्या विलक्षण मिश्रणाने साकारल्या आहेत. या कलाकृती मातीसच्या कामाची आठवण करून देतात. प्रदर्शनातील अमिता दंड यांच्या अपारंपरिक शैलीत प्रस्तर आणि पोत यांची जुळवाजुळव रसिकांच्या पसंतीस उतरते आहे. भूषण तुळपुळे यांच्या मंडल कलाकृती एखाद्याला थेट शांततापूर्ण आध्यात्मिक क्षेत्रात आमंत्रित करतात. विश्वनाथ खिलारी यांची वास्तववादी निसर्गचित्रे त्यांच्या स्पंदनशील जिवंतपणामुळे रसिकांचं लक्ष कलाकृतीवर खिळवून ठेवतात. सतीश डिंगणकर यांच्या कलाकृती या अभिव्यक्ती, रंग आणि रूप यांच्या परिपूर्ण संतुलनाची उदाहरणे आहेत. कविता तांबोळकर यांच्या पारंपरिक शैलीतील कलाकृती या सुखदायक आणि प्रणयभान देणाऱ्या वाटतात. प्रीती शाहच्या कॅनव्हासवरील त्रिमितीय कलाकृती या प्रदर्शनाला नाट्यमय आणि गूढ भावनांचा मुलामा चढवतात. अर्पित व्यास यांच्या भव्य कलाकृतीमध्ये एकाच वेळी पॉप आर्ट आणि वास्तववादी कलेचा आस्वाद घेता येतो. कॅनव्हासवर सुलोचना गावडे यांची कॅनव्हासवरील तैलरंग माध्यमातील प्राचीन शिल्पे अत्यंत सुखद आणि मूलगामी परंपरेकडे नेणारी ठरतात. नेहा प्रसादची बहुमुखी चित्रे मनमोहक दिसतात.
रोमर्टिकाने आयोजित केलेल्या या ग्रुप शोने अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कला संग्राहकांना आकर्षित केले आहे. २२ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी क्लब रोमर्टिका नीतेश मिश्रा, निलांजना रॉय, देवयानी ठाकरे, अर्पित व्यास आणि ऋषी बक्षी हे पाच कलाकार मलाका इथे परफॉर्मन्स आर्ट सादर करणार आहेत. रोमर्तिकाच्या इतर प्रदर्शनांप्रमाणेच हा कार्यक्रम रसिकांना खिळवून ठेवणार हे निश्चित.
त्यामुळे पुण्यातील कला रसिकांना एकाच व्यासपीठावर कलेचा बहुआयामी आस्वाद देणारा हे प्रदर्शन चुकवू नये असेच आहे.