NEWS

स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासात सातत्य ठेवायला हवे

Share Post

“बँकिंग, एमपीएससी यांसारख्या परीक्षा तुम्हाला शासकीय सेवेची संधी देतात. बँक अधिकारी, सरकारी अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षांच्या अभ्यासात सातत्य ठेवायला हवे,” असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

देशातील नामवंत बँकिंग इन्स्टिट्यूट असलेल्या विनर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजिलेल्या विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव समारंभात चंद्रकांत पाटील बोलत होते. नवी पेठ येथील इंदुलाल कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते ३५२ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभागृह नेते धीरज घाटे होते. यावेळी विनर इन्स्टिट्यूटचे संचालक अभय सात्यकी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, लोकसेवा पब्लिकेशनचे आप्पा हातनुरे, जयश्रद्धा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे संस्थापक जयराज हाडके, विनर इन्स्टिट्यूटच्या चेअरपर्सन मृदुल मेश्राम आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “एमपीएससी, यूपीएससी आणि बँकेच्या परीक्षा खडतर असतात. मात्र, अभ्यासातील सातत्य, चिकाटी अशा परीक्षांमध्ये यश मिळवून देते. त्याला चांगल्या मार्गदर्शनाची जोड गरजेची असते. विनर इन्स्टिट्यूट मार्गदर्शकाची ही गरज अत्यंत चांगल्या रीतीने पूर्ण करत असल्याचे तुमच्या यशावरून दिसते.”

श्रेयस तळपदे म्हणाले, “आतून प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे. आपल्या जडणघडणीत गुरुचे योगदान मोठे असते. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरचा मार्ग कसा निवडावा आणि त्यावर यशस्वी प्रवास कसा करावा, याची दृष्टी देणारा हा कार्यक्रम आहे. जिंकण्याची उमेद देणारा ‘विनर’चा हा मंच बँकिंग व सरकारी अधिकारी होऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहे.”

विनर इन्स्टिट्यूट बँकिंगसह इतर अनेक सरकारी नोकऱ्यांच्या संदर्भात अभ्यासक्रम शिकवणारी अग्रणी संस्था आहे. गेल्या १२ वर्षात संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना आयबीपीएस, एसबीआय, पीओ, आरबीआय, एसएससी, कॅट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करून घेतली आहे, असे प्रास्ताविकात अभय सात्यकी यांनी सांगितले.

धीरज घाटे यांनी अध्यक्षयीय मनोगत व्यक्त केले. सरस्वती शेंडगे, रजनीश कुमार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *