‘स्टार्टअप’ संस्कृती शेतकरी, कृषी क्षेत्राला उभारी देईल
“पूना ॲग्रोकार्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्या बांधावर सीड ते विक्रीपर्यंतचे सर्व मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी ‘सीड टू हार्वेस्ट’ ही संकल्पना चांगली आहे. कृषी क्षेत्रात स्टार्टअप संस्कृती रुजत असून, असे प्रयोग शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्राला उभारी देतील,” असे मत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.
स्टार्टअप इंडिया, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत खास शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात आलेल्या पूना ॲग्रोकार्ट संचालित ग्रोझो या कृषीविषयक स्टार्टअप ॲपचे लोकार्पण खराडी येथील प्लांटमध्ये अशोक पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुरेंद्र पठारे, पूना ॲग्रोकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी लंका शिवकुमार रेड्डी, वित्त विभागाचे प्रमुख किरण जाधव, विक्री विभागाचे प्रमुख मयुर जारकड, विपणन विभागाचे प्रमुख किरण दोंड, मनुष्यबळ विभागाचे प्रमुख शाहू पवार आदी उपस्थित होते.
अशोक पवार म्हणाले, “शेतीमध्ये शेतकरी काबाडकष्ट करतो. परंतु त्याच्या मालाला चांगले पैसे मिळत नाहीत. या प्रयोगामुळे शेतकऱ्यांचा माल ग्रेडिंग, पॅकिंग होऊन गुणवत्तेनुसार ग्राहकांना मिळेल. त्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. ही मोठी चैन होणार असून, याची व्याप्ती वाढत जाणार आहे. ग्राहकांना चांगला माल मिळणे अपेक्षित आहे. त्याची गरज भागवण्यासाठी या ॲग्रोकार्टने पुढाकार घेतला आहे. शेतीसंबंधी कामे ऑनलाईन व्हावीत, यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून प्रयत्न करत आहे. आज त्याचा फायदा नागरिकांना होत आहे. शेतकऱ्यासाठी नवीन संकल्पना राबविणे गरजेचे आहे. वाघोली परिसरात मोठमोठे मॉल उभा राहत आहे. येथील अनेक ग्राहकांना या पूना ॲग्रोकार्ट नक्कीच फायदा होईल. शेतकऱ्यांना असे स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देऊ.”
लंका शिवकुमार रेड्डी म्हणाले, “या स्टार्टअपशी १०० पेक्षा अधिक गावांतील १० हजार पेक्षा अधिक शेतकरी जोडले जाणार आहेत. सध्या ॲपवर हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्याचा ताजा शेतमाल थेट ग्राहकांना पुरवला जाईल. दर्जेदार, स्वच्छ व आरोग्यदायी भाजीपाला, फळे घरपोच पुरवली जाणार आहेत.
माजी आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, “ग्राहकांना चांगल्या शेतमालाची गरज असते. ती भागविण्यासाठी पूना अग्रोकार्टने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून ग्राहकांना ताजा आणि चांगल्या प्रकारचा माल मिळणार असून ग्राहकांनी ही कुठेही तडजोड करू नये.”