सोनी सबवरील ध्रुव तारा मालिकेतील कलाकारांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सणानिमित्त व्यक्त केल्या हृदयस्पर्शी भावना
भगवान कृष्णाची प्रार्थना करत देशभरात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात येतो. यात कृष्णाचा पाळणाा सुंदरपणे सजवला जातो, नृत्य आणि संगीताची प्रस्तुती दिली जाते. दहीहंडी उत्सवासोबतच बरेच काही साजरे करण्यात येते. अशा या विशेष उत्सवानिमित्त सोनी सबवरील सेलिब्रिटींनी जन्माष्टमीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
ताराची भूमिका साकारणारी रिया शर्मा म्हणाली की, “भगवान श्रीकृष्ण यांच्यात खोडकरपणा, प्रेम, बुद्धिमत्ता आणि शौर्य यांचा सुंदर मिलाप होता. भगवद्गीतेमध्ये त्यांनी दिलेली शिकवण ही आपल्या आयुष्यात प्रत्येक पाऊल टाकण्यात मदत करते. मी जेव्हा भगवान श्रीकृष्णांची भजने ऐकते तेव्हा मला खूप मन:शांती लाभते. जन्माष्टमीचा उत्साह हा अद्भूत आहे. मला वाटते की मालिकेत ताराची भूमिका साकारल्यामुळे भगवान श्रीकृष्णाप्रती माझ्यातील आध्यात्मिक जवळीक आणखीच घट्ट झाली आहे. इतकेच नव्हे तर यामुळे माझ्यातील भक्तिची भावना आणखीच समृद्ध झाली आहे. या वर्षी ध्रुव ताराच्या सेटवर मी हा दिवस माझ्या रील फॅमिलीसोबत साजरा करणार आहे. या जन्माष्टमीला माखनचोर भगवान श्रीकृष्ण तुमच्या चिंतांचे हरण करो, तुम्हाला सुख समृद्धी आणि शांतता लाभो, हीच प्रार्थना.”
मालिकेत महावीरची व्यक्तिरेखा चितारणारा कृष्ण भारद्वाज म्हणाला की, “मला आठवते की शालेय दिवसांत आम्ही ‘कान्हाजी’ची वेशभूषा धारण करून हा दिवस साजरा करायचो. आम्हाला मोठ्या लाडाकोडाने स्वादिष्ट पदार्थ भरवले जायचे, प्रेमाचा वर्षाव व्हायचा. या वर्षी घरी एक छोटेखानी उत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारण मी ध्रुव तारासाठी या दिवसाआधी आणि नंतर चित्रीकरण करणार आहे. आम्ही मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत. त्या आधी पूजा केली जाईल, पंजिरी, खीर आणि माखन-मिश्रीचा प्रसाद तयार केला जाईल. या वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे, ती म्हणजे, भगवान श्रीकृष्णांनी प्रत्येकाच्या चिंता दूर कराव्यात, त्यांच्यावर प्रेम, सुखशांतीची पखरण करावी.”
मालिकेत ध्रुवची मुख्य भूमिका निभावणारा अभिनेता इशान धवन म्हणाला, “घरातील थोरामोठ्यांसोबत मेजवानीची तयारी करणे असो की, एकत्रितपणे प्रार्थना, आपल्या प्रियजनांसोबत जन्माष्टमी साजरी करण्याचा माझ्या आयुष्यावर खूप सकारात्मक परिणाम झालेला आहे. आपण हा सण साजरा करत असताना सर्वच परिवारांतील बाळगोपाळांना माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा देतो. हा शुभदिन तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि आनंद घेऊन येवो. तसेच भगवान श्रीकृष्णांनी दिलेल्या शिकवणी आपल्या सामावून जावोत. आपण सर्व प्रेम, करुणा आणि विद्वत्तेच्या गुणांना कवटाळण्याचा प्रयत्न करूयात. जेणेकरून आपले आयुष्य आणि हे जग आणखीच उत्तम होण्यास मदत मिळेल. यंदाच्या वर्षी मी माझ्या ध्रुव तारा परिवारासोबत जन्मष्टमी साजरा करणार आहे. त्याआधी मी इस्कॉन मंदिराला भेट देऊन तेथील प्रसाद ग्रहण करणार आहे. जन्माष्टमीच्या खूप शुभेच्छा.”
मालिकेत रणछोडची भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ अरोरा म्हणाला की, “”माझ्या मूळगावी एका महिन्याआधीच ‘कृष्णलीला’साठी अपेक्षा सुरू व्हायच्या. तेथे तीव्र प्रकाशझोत असायचा, उचित वेशभूषा, सजवलेला रंगमंच, जोरदार ध्वनियंत्रणा आणि काही रुचकर खाद्यपदार्थ असायचे. आमची पोरासोरांची टोळी दिवसभर मंदिराच्या आवारातील पटांगणात उड्या मारत उत्सव साजरा करायची. यंदाच्या वर्षी माझ्यासाठी जन्माष्टमीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मला ध्रुव तारामध्ये भगवान श्रीकृष्णांचे पात्र साकारण्याची संधी मिळालेली आहे. हा अनुभव स्वप्नातीत आहे. कारण लहानपणी मला दैवी कान्हासारखी वेशभूषा घातली जायची. माझी खेळकर भक्ती ते पडद्यावर या महान दैवताची भूमिका साकारण्याच्या या प्रवासाने भगवान श्रीकृष्णांसोबत माझे नाते अधिकच प्रगाढ केले आहे. यामुळे ही जन्माष्टमी माझ्या आयुष्यात अधिकच आध्यात्मिक क्षण ठरली आहे. सेटवर माझ्या समर्पित ध्रुव सदस्यांसोबत या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी मी मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे. भगवान श्रीकृष्ण तुमचे कल्याण करो! हॅपी जन्माष्टमी.”