NEWS

सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका- आशीर्वाद तुझा एकवीरा आई

Share Post

सोनी मराठी वाहिनी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहे. समकालीन मालिकांबरोबरच ‘ज्ञानेश्वर माउली’, ‘गाथा नवनाथांची’अशा भक्तिपर मालिकांच्या यशानंतर आता एकवीरा आईचा महिमा दाखवणारी ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेवून येत आहे. एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्याजवळ आहे. आगारी कोळी समाजासह अन्य लोकांचेही हे कुलदैवत आहे. पौराणिक कथेनुसार कार्ला येथील मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. तसेच एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.

‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेतील कलाकारांनी कार्ला (लोणावळा) येथे एकवीरा आईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या नंतर आयोजित पत्रकार परिषदेस एकवीरा आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेत्री अमृता पवार, मालिकेचे निर्माते दिग्पाल लांजेकर, लेखक आणि निर्माते चिन्मय मांडलेकर, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोनी मराठी फ़िकशन हेड – सोहा कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेत विविध व्यक्तिरेखा साकारलेली अभिनेत्री अमृता पवार ही प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर अभिनेत्री मयूरी वाघ ही यामध्ये एकवीरा आईच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत आपण मयूरीला अनेक आव्हानात्मक भूमिका साकारताना पाहिले आहे. मात्र या मालिकेत ती आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या मालिकेत तानिया ठाकूर (अमृता पवार) एकविरा आई (मयुरी वाघ), शिवा (निषाद भोईर), अनिश राजेबद्दर (अभिनय सावंत), भीमाई (सविता मालपेकर), मोचन महाराज (मिलिंद सफई),मुकुटराव राजेबद्दर (धनंजय वाबळे) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ येत्या २८ नोव्हेंबरपासून, सोम – शनि, रात्री ८ वाजता. सोनी मराठीवर प्रसारित होणार आहे.

‘ ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ मालिकेतील भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री मयूरी वाघ म्हणाली, या मालिकेत मी एकवीरा आईची भूमिका साकारत आहे. एकवीरा आईचे चमत्कार आपण ऐकले आहेत. अनेकांनी ते अनुभवले आहेत. संकटातून एकवीरा आई आपल्या भक्तांना कशी तारून नेते हे आता तुम्हाला आता पाहायलाही मिळणार आहेत. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या मिळाव्यात हे प्रत्येक कलाकाराला वाटते. आजपर्यंत मी अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र एखादी पौराणिक भूमिका आपण करावी असं मला वाटत होत. त्याच वेळेस एकवीरा आईच्या आशीर्वादाने ही भूमिका चालून आली. यामध्ये एकवीरा आईची भूमिका साकारन ही खूप मोठी जबाबदारी आहे. एकवीरा आईच्या भक्तांना ही मालिका आवडेल अशी अपेक्षा आहे.

अभिनेत्री अमृता पवार म्हणाली, ” ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेत तानिया नावाची भूमिका की साकारत आहे. एकवीरा आईचे लाखो भक्तगण आहेत. त्यातलीच एक तानिया असून तिची एकवीरा आईवर खूप श्रद्धा आहे. अनेक संकटातून एकवीरा आई तानियाला मार्ग दाखवते. हा भक्तिमय प्रवास लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.”

सोनी मराठीचे बिजनेस हेड अजय भाळवणकर म्हणाले, सोनी मराठी नेहमीच वेगवेगळ्या कल्पना आणते. ही एक वेगळ्या प्रकारची मालिका आहे, ही फक्त पौराणिक किंवा भक्तीची मालिका नाही तर तानिया तिच्या आयुष्यात तिच्या भक्ती मुळे कशी तारुण जाणार आहे हे या मालिकेमधून मधून लोकांना पाहायला मिळेल. या मालिकेतून प्रेक्षकांना मनोरंजन आणि बोध मिळेल असे आम्हाला वाटते.

या मालिकेची निर्मिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि लेखक, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्या मुळाक्षर प्रॉडक्शन ने केली आहे. विशेष म्हणाले चिन्मय मांडलेकर स्वतः या मालिकेचे लेखन करत आहेत. या मालिकेचे दिग्पाल लांजेकर यांनी लिहिलेले शीर्षक गीत अतिशय सुंदर झाले आहे. हे गीत केवल वाळंज आणि जुईली जोगळेकर यांनी गायले असून देवदत्त बाजी यांनी संगीतबद्ध केले आहे. या मालिकेत एकवीरा आई आणि तिच्या भक्तांचे अतूट नाते बघायला मिळणार आहे. तेंव्हा पाहायला विसरू नका आपल्या लाडक्या सोनी मराठी वाहिनीवर ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ येत्या २८ नोव्हेंबरपासून, सोम – शनि, रात्री ८ वाजता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *