सुदर्शन मित्र मंडळातर्फे पुनीत बालन यांचा विशेष सन्मानकोविड काळात आणि त्यानंतरही गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या पाठबळाबद्दल कृतज्ञता
कोविडच्या संकटामुळे कोणतेही उत्सव आर्थिक पाठबळ नसल्याने उत्साहाने साजरे झाले नाहीत. गणेशोत्सव हा केवळ पुण्याचा नव्हे, तर महाराष्ट्राचा मानबिंदू. मात्र, कोविड संकटामुळे गणेशोत्सव मंडळांनाही आर्थिक पाठबळ न मिळाल्याने कार्यकर्ते हतबल झाले होते. अशा परिस्थितीत व त्यानंतरही गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या पाठबळाबद्दल उद्योजक पुनीत बालन यांचा विशेष सन्मान फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील सुदर्शन मित्र मंडळातर्फे करण्यात आला.
यावेळी डॉ.शैलेश गुजर, सुदर्शन मित्र मंडळाचे अध्यक्ष शाम मारणे, विनोद चव्हाण, प्रमोद पवार, रुपेश कापडे, योगेश धुमाळ, प्रमोद चव्हाण ,सतीश पिल्ले यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. पुणेरी पगडी, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते.
डॉ. शैलेश गुजर म्हणाले, पुण्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. अखंडितपणे अत्यंत उत्साहात हा उत्सव दरवर्षी केला जातो. मात्र कोविडच्या काळात याला काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी विघ्नहर्त्याप्रमाणे पुनीत बालन यांनी गणेश मंडळांना मदतीचा हात दिला. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
शाम मारणे म्हणाले, कोविड काळात आणि त्यानंतरही गणेशोत्सव मंडळांना मिळणा-या वर्गणी व देणगीचा ओघ अत्यंत कमी झाला होता. त्यामुळे सण-उत्सव साजरे करणे, सामाजिक उपक्रम राबविणे जवळपास बंद झाले. अशा वेळी आॅक्सिरिच आणि पुनीत बालन यांनी मदतीचा हात दिल्याने श्री गणेशाची विधीवत स्थापना, सजावट, मिरवणुका काढणे शक्य झाले. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक क्षेत्रात म्हणजेच गणेशोत्सवाप्रती दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान केला आहे, असेही त्यांनी सांगितले.