NEWS

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा तिसरा पदवीप्रदान सोहळा उत्साहात संपन्न

Share Post

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, किवळेतर्फे तिसऱ्या दीक्षांत समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या समारंभात एकूण ७२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झाला. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. एस.बी. मुजुमदार ह्यांच्या अध्येक्षतेखाली झालेल्या या समारंभास फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश खत्री हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते .तसेच सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र- कुलपती, डॉ. स्वाती मुजुमदार, आणि प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिउरकर, या समारंभास उपस्थित होते. कौशल्य विद्यापीठाच्या उद्दिष्टांविषयी बोलताना एसएसपीयूच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की, कौशल्य विद्यापीठ हा शैक्षणिक क्षेत्रातील नवा प्रयोग असून ,आम्ही ७० टक्के प्रात्यक्षिक शिक्षणावर भर देतो . तसेच त्यांनी यावेळेस उपस्थितांना विद्यापीठाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. डॉ. एस.बी. मुजुमदार हे भारतातील कौशल्य-आधारित शिक्षणाची गरज अधोरेखित करताना म्हणाले की , भारताची अधिकाधिक लोकसंख्या ही रोजगारक्षम आहे. ही भारतासाठी विशेष बाब आहे; आणि या लोकसंख्येला कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन याचा फायदा भारताला अधिक सक्षमशील बनविण्यासाठी होऊ शकतो . तसेच कौशल्याधारित शिक्षणामुळे भारतातील तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. आणि यातूनच उद्योगधंद्यांना देखील कुशल मनुष्यबळ मिळेल. ते पुढे म्हणाले की आपल्या देशातील तरुणांना कौशल्य-आधारित प्रशिक्षण देण्याचा एसएसपीयुचा महत्वपूर्ण वाटा आहे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, राज्याला कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज आहे ज्यामुळे तरुणांना स्थानिक उद्योगांमध्ये नोकऱ्या मिळण्यास मदत होईल आणि त्याच वेळी कुशल मनुष्यबळाची उद्योगाची मागणी पूर्ण होईल. उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी केल्याबद्दल त्यांनी एसएसपीयुचे अभिनंदन केले. तसेच विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमातून विविध कौशल्ये आत्मसात करणाऱ्या महिलांचेही राज्यपालांनी अभिनंदन केले. श्री राजेश खत्री यांनी फियाट-सिंबायोसिस विंग्यान ह्या उपक्रमातील अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल तसेच उत्तम नोकरी मिळाल्याबद्दल मुलींचे अभिनंदन केले. फियाट इंडिया आणि सिंबायोसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांच्यातील हा संयुक्त प्रकल्प आर्थिक दृष्ट्या वंचित मुलींना मॅन्युफॅक्चरिंग एक्ससिल्लेन्स क्षेत्रात प्रशिक्षण घेण्याची संधी प्रदान करतो.फियाट सीएसआरच्या माध्यमातून या मुलींच्या प्रशिक्षणासाठी निधी पुरविला जातो. दीक्षांत समारंभात पदविका मिळालेल्या पहिल्या बॅचला उत्तम पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत तिसऱ्या दीक्षांत समारंभात, ७२२ विद्यार्थ्यांना (४११ पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी, ३० पदविका आणि २८१ प्रमाणपत्रे) विद्यापीठातील कौशल्य अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.तसेच दरवर्षी दिले जाणारे सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला’ कुलपती सुवर्णपदक यावर्षी तुराई अंजनेय कृष्णा, बी. एस्सी . डेटा सायन्स, आणि . पाटील सोहन अरुण, एम . टेक मेकॅट्रॉनिक्स यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर पुरस्कार देणारे एसएसपीयु हे भारतातील पहिले विद्यापीठ आहे. दरवर्षी विद्यापीठातील अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या आणि स्वतःचा नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यास हा पुरस्कार दिला जातो.या वर्षीचा आत्मनिर्भर पुरस्कार हा बी टेक – मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंगचा विद्यार्थी अब्राहम फर्नांडिस याला स्वतःचा कागदी पिशवी निर्मिती व्यवसाय सुरू करण्यासाठी व त्याद्वारे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रदान करण्यात आला आहे. विद्यापीठातील कौशल्ये आत्मसात करून यशस्वीपणे करिअर सुरु करणाऱ्या स्वप्नील मखरे आणि स्वाती पांचाळ या विद्यार्थ्यांना कुशल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . दहावीनंतर दोन वर्षाची पदविका देणारे सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी हे पहिले विद्यापीठ आहे . ह्या पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना देण्यात येते . तसेच कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना एसएसपीयुतर्फे उमेद जागर या उपक्रमाद्वारे विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विधवा महिलांना या दीक्षांत समारंभात प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *