सामान्य माणसाला समोर ठेवून पत्रकारांनी काम करावे-डॉ.नीलम गोऱ्हे
आर.के. लक्ष्मण यांनी ज्याप्रमाणे सामान्य माणसाच्या व्यथा व्यंगचित्रातून मांडल्या तसे सामान्य माणूस समोर ठेवून, त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पत्रकारांनी काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, मिलिंद अष्टीकर, विनोद जगदाळे, अरुण कांबळे, सुनील लोणकर बाबासाहेब ढसाळ आदी उपस्थित होते. श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणाऱ्या बातम्या वाचायला चांगल्या वाटतात. पत्रकारिता आणि न्यायव्यवस्था हा नागरिकांचा खरा आधार आहे. अशा प्रकारच्या पत्रकारितेची समाजाला गरज आहे. केवळ टीआरपी केंद्रीत बातम्यांभोवतीच केवळ पत्रकारिता फिरू नये आणि सभोवतीच्या गढूळ वातारणातही चांगले घडविण्यासाठी व्यावसायिकरित्या चांगले काम करणाऱ्या आणि निर्भयपणे काम करणाऱ्या पत्रकारांना प्रतिसाद मिळावा. आज समाजातली असहिष्णुता वाढली आहे. पूर्वी भाषेतला रांगडेपणा होता.
मात्र अलिकडे टीका करण्यातला वैचारिक स्तर खालावला आहे. याचा समाजातल्या पत्रकारांना जसा त्रास होतो तसे ज्यांना काही विचार व्यक्त करायचे आहे त्यांनाही त्रास होतो. वर्तमानपत्र आज उत्पादन झाले आहे. त्यामुळे त्याचा खप वाढवणे, इतरांना जोडून घेणे, इतरांपेक्षा अधिक चांगले उत्पादन करणे महत्वाचे झाले आहे. कोविडनंतर वृत्तपत्रांना मोठा फटका बसला. काहींची नोकरी गेली, काहींचे कोरोनामुळे निधन झाले. उपसभापती असूनही फार करता आले नाही याचा खेद वाटतो. कोविडमध्ये जे पत्रकार दगावले त्यांची जबाबदारी उद्योग म्हणून चालविल्या जाणाऱ्या माध्यम समूहांनी स्विकारावी आणि दुसऱ्या बाजूला काही वृत्तपत्रांमध्ये बातम्यांपेक्षा जाहीराती मिळविणे हे प्रमुख काम पत्रकाराला करावे लागते. पत्रकारिता व्यावसायिक असू नये असे आपण म्हणतो, पण तो व्यवसाय झाला जरी असला तरी व्यवसायाचे नियम पाळून पत्रकारांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळणे गरजेचे आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.