29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

'सहेला रे'... काही नात्यांना नाव नसतं

‘सहेला रे’… काही नात्यांना नाव नसतं

Share Post

‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी, अ व्हिस्टास कॅपिटल कंपनीने प्रेक्षकांना विविध विषयांवरील अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले. आता असाच एक दर्जेदार वेबचित्रपट प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबचित्रपटात मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकतेच सोशल मीडियावर ‘ सहेला रे’चे पोस्टर झळकले असून ही एक नातेसंबंधावर भाष्य करणारी कथा असल्याचे कळतेय. ‘काही नात्यांना नाव नसतं’, अशी टॅगलाईन असलेल्या या वेबचित्रपटात मैत्रीच्या पलीकडचे एक संवेदनशील नाते पाहायला मिळणार आहे.

प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ही एक परिपक्व नात्याची कहाणी असून नात्यातील विविध पैलू यात अलगद उलगडणार आहेत. नकळत स्वतःचाच स्वतःला नव्याने शोध लागेल. मुळात ही एक संवेदनशील आणि कौटुंबिक कथा असून ती प्रेक्षकांना नक्कीच भावेल. यातील कलाकार, कथानक, दिग्दर्शन अशा अनेक जमेच्या बाजू असून लवकरच प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर हा चित्रपट पाहाता येणार आहे.”

दुबईमध्ये झालेल्या ‘एक्स्पो २०२० दुबई’ या सोहळ्यात ‘प्लॅनेट मराठी’च्या ‘सहेला रे’ या चित्रपटाचे टीझर लाँच करण्यात आले होते. गोवा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. तर नुकताच ५ वा इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टनमध्येही ‘सहेला रे’च्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. अशा अनेक नामांकित फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच पसंती दर्शवतील. अक्षय बर्दापूरकर व ‘प्लॅनेट मराठी’ प्रस्तुत ‘सहेला रे’ची कथा, पटकथा आणि संवादही मृणाल कुलकर्णी यांचे आहेत.