NEWS

सहकारी संस्था आणि बचतगटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सरकारचे सहकार्य – विनोद तावडे

Share Post

सहकार चळवळीमध्ये महिलांचा सहभाग महत्वाचा असून बचतगटांंच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी देशभर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी आज येथे केले. सहकार भारतीचा सिम्पली देसी उपक्रम आणि ई-कॉमर्समधील अग्रेसर असलेल्या फ्लिपकार्ट कंपनीद्वारा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिध्द अभिनेते स्वप्नील जोशी, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, फ्लिपकार्टचे वरिष्ठ अधिकारी रजनीश कुमार आणि सिम्पली देसीच्या अध्यक्षा मधुबाला साबू उपस्थित होत्या.
यावेळी बोलतांना तावडे पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रामध्ये भरीव काम वाढवण्याची गरज आहे. महिलांच्या कार्याला अधिक वाव मिळण्याच्या दृष्टीने सहकारात अनेक प्रयोग करणे शक्य आहे. केंद्र सरकार या सर्व कामासाठी निश्‍चित सहकार्य देईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करुन घेतला पाहिजे.
सर्वांचे स्वागत करतांना आपल्या प्रास्ताविकात मधुबाला साबू म्हणाल्या की, बचतगट, कुटीरोद्योग त्याचबरोबर ग्रामीण भागातील सहकारी संस्थांमधील होणारे व्यवसाय, त्यांची उत्पादने या सर्वांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याबाबतची जनजागृती व्हावी आणि विक्रीकरीता फ्लिपकार्टसारख्या मोठ्या कंपन्यांशी जोडून घ्यावे या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजच्या स्पर्धात्मक युगात अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन सर्वांना सक्षम करणे आणि संघटीतपणे स्वावलंबी योजनांना मूर्त स्वरुप देणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. या कार्यक्रमाला विविध ग्रामीण आणि शहरी गावांमधून सुमारे अठराशेहून अधिक महिला उद्योजक व बचतगटांच्या प्रमुख सदस्य उपस्थित होत्या.
यावेळी श्री. ठाकूर म्हणाले की, सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सहकारी संस्थांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठेची सुलभता अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. तर श्री. रजनीश कुमार म्हणाले की, सर्व संबंधित संस्थांनी, सहभागी महिलांनी फ्लिपकार्टशी जोडून घ्यावे व अधिकाधिक व्यवसाय करावा, यासाठी लागणारे सर्व सहकार्य निश्‍चितपणाने मिळेल.
यावेळी झालेल्या प्रशिक्षणात फ्लिपकार्टच्या वतीने व्यवसाय विकास, विपणन यावर मार्गदर्शन सत्र घेण्यात आले तर बाजारपेठेतील अस्तित्व वाढवण्यासाठी आणि उदयोन्मुख संधींचा लाभ घेण्यासाठीचा व्यावहारिक दृष्टीकोन या प्रशिक्षणातून मिळाल्याचे उपस्थित महिलांनी विशेषकरुन सांगितले.
सहकार भारतीच्या महिला प्रकोष्टप्रमुख रेवती शेंदुर्णीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले तर स्वाती मोहरील व कमलेश फलकुंडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी रायसोनी महाविद्यालय व मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *