26/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

‘सरी’तील ‘मला का भासे’ हे प्रेमगीत प्रदर्शित

Share Post

यापूर्वी कधीही न ऐकलेलं, आल्हाददायी, प्रेमी युगुलांच्या मनाचं ठाव घेणारं, स्वतःचं अस्तित्व हरवून समोरच्यावर जिवापाड प्रेम करणं, ही प्रेमाची व्याख्या सांगणारं ‘सरी’ चित्रपटातील ‘मला का भासे’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. शैली बिडवाईकर, संजिथ हेगडे यांचा सुरेल आवाज लाभलेल्या या गाण्याचे संगीतकार बी अजनीश लोकनाथ असून मंदार चोळकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केलं आहे.

‘सरी’ या चित्रपटातील ‘मला का भासे’ हे प्रेमगीत सोशल मीडियावर प्रदर्शित झालं असून या गाण्यात दिया (रितिका श्रोत्री) आणि रोहित (अजिंक्य राऊत) यांच्यात हळुवार खुलणारं प्रेम दिसत आहे. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले दिसत असून त्यांचा प्रेमाचा प्रवास या गाण्यात पाहायला मिळत आहे. परंतु दियासोबत अजून एक व्यक्ती म्हणजेच आदी (पृथ्वी अंबर) सुद्धा दिसत आहे. त्यामुळे दियाच्या आयुष्यात नेमकं कोणं आहे, हे चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांच्या समोर येईल. प्रेमाच्या सुरूवातीच्या सोनेरी क्षणांची आठवण करून देणाऱ्या या गाण्याचे सुरेल बोल मनाला भिडणारे असून संगीतही अतिशय श्रवणीय आहे. येत्या ५ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, “माझं संगीतावर खूप प्रेम आहे, मला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला आवडते. सुरूवातीपासूनच मी मराठी संगीत ऐकत आलो आहे त्यामुळे मराठी संगीतकारांसोबत आणि गायकांसोबत काम करणं, हा वेगळा अनुभव होता. याआधी प्रदर्शित झालेलं ‘संमोहिनी’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच ‘मला का भासे’ हे प्रेमगीतही प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केलं असून रितिका श्रोत्री, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.