‘सरी’तील ‘बदलली वाऱ्याने दिशा’ हे विरहगीत प्रदर्शित
प्रेम ही अशी गोष्ट आहे, जी आयुष्यात कोणालाच सहजासहजी मिळत नाही. प्रेमीयुगुलांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. कधी स्वतःशीच तर कधी कुटुंबाशी, समाजाशी लढाई करावी लागते. प्रेमात एकमेकांना समजून घेत शेवटपर्यंत सोबत पुढे जाणे, हीच प्रेमाची खरी परीक्षा असते. प्रेमाची हीच अग्निपरीक्षा दाखवणारे ‘सरी’ चित्रपटातील ‘बदलली वाऱ्याने दिशा’ हे भावनिक गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. मंदार चोळकर यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे. आदर्श शिंदे यांच्या आवाजातील हे गाणे मनाला भिडणारे आहे.
या गाण्यात दिया (रितिका श्रोत्री) आणि आदी (पृथ्वी अंबर) यांच्या मनातील तगमग दिसत असून विरहाचे हे गाणे मन हेलावणारे आहे. यात रोहितचीही (अजिंक्य राऊत) झलक दिसत आहे. त्यामुळे आता यात नक्की कोणाला प्रेमाचा त्याग करावा लागणार, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. येत्या ५ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
दिग्दर्शक अशोका के. एस. म्हणतात, ” या चित्रपटातील दोन गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली असून त्यांना संगीतप्रेमींचा भरपूर प्रतिसादही मिळत आहे. प्रेमातील तरल भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्यांनंतर ‘सरी’मधील भावनिक गाणं आता प्रदर्शित झालं आहे. याचे बोल मनाला स्पर्श करणारे आहेत. प्रेमात विरह आल्यावर जी मनाची घालमेल होते, ती या गाण्यातून व्यक्त होत आहे.”
कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक अशोका के. एस. असून रितिका श्रोत्री, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.